निरंतर योगा करा, व्याधींपासून दूर राहा

योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह राम खांडवे यांचा कानमंत्र
International Yoga Day 2022
International Yoga Day 2022sakal

नागपूर : दररोज नियमित किमान तासभर योगा, प्राणायाम व आसने केल्याने मन प्रसन्न राहून दैनंदिन कामे करताना नवी ऊर्जा मिळते. शरीर सुदृढ राहून विविध आजार व व्याधींपासून मुक्ती मिळते. त्यामुळे लहानांसह, तरुण व ज्येष्ठांनी निरंतर योगा करावा, असे आवाहन जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह राम खांडवे यांनी केले.

गेल्या ४३ वर्षांपासून उपराजधानीत योगाचा प्रचार व प्रसार करणारे ८२ वर्षीय खांडवे यांनी आजच्या धकाधकीच्या काळात योगाची खूप आवश्यकता असल्याचे सांगितले. ते म्हणाले, योगा हा केवळ शारीरिक व्यायामप्रकार नसून त्याचा मानसिकतेशीही संबंध आहे. मानसिक अवस्था सर्व आजारांचे मूळ कारण आहे. मन स्वस्थ असेल तर शरीरही उत्तम राहाते. हायपर टेंशन, डिप्रेशन, अपचन, निद्रानाश, ब्लडप्रेशर, डायबिटीस, कर्करोग, स्पॉंंडीलायटीस, सायटिका, लठ्ठपणा यासारख्या आजारांपासून दूर राहता येऊ शकते. अलोपॅथी उपचाराने आजार तात्पूरते दूर करता येऊ शकतात. मात्र कायमस्वरूपी उपाय केवळ योगामध्येच आहे. योगामुळे चित्तवृत्तीचे शमन होत असल्याने वासना व भावनांवर मात करता येते. तसेच स्वार्थ, राग व अहंकारासारख्या दुर्गुणांपासून दूर राहण्यास मदत होते.

आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असल्यापासून योगाविषयी जनजागृती वाढल्याचे राम खांडवे यांनी सांगितले. यानिमित्ताने सर्वसामान्यांना योगाचे महात्म्य पटवून दिले जात असल्याने यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनविले आहे. हा केवळ एका दिवसापूरता इव्हेंट न राहता बाराही महिने योगाबद्दल चर्चा व तो अंगिकारण्याची गरज आहे.

ऑनलाइनमुळे देशविदेशात पोहोचला

कोरोनामुळे जवळपास दोन वर्षे ऑनलाइन शिक्षण झाल्यामुळे लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागले. त्यांच्या कोवळ्या मनावर विपरित परिणाम झाला असला तरी, त्याचा योगाला फायदाही झालेला आहे. यानिमित्ताने ऑनलाइन योगाचे चलन वाढून देशविदेशात योगाचा प्रचार व प्रसार होऊ शकला. या काळात अमेरिका, इंग्लंड, आफ्रिका व खाडी देशांमध्ये योगा पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

रामदेवबाबा व मोदींचेही योगदान

रामदेवबाबांमुळे योगा घराघरांमध्ये पोहोचला. तर मोदींमुळे संयुक्त राष्ट्रसंघात ठराव पारित झाल्याने जगाने योगाची दखल घेतली. तेव्हापासून देशविदेशातील लोकांना योगाचे महत्त्व कळल्याच खांडवे म्हणाले.

जनार्दनस्वामी मंडळाचे मोठे कार्य

उपराजधानीत जनार्दनस्वामी मंडळाचे मोठे कार्य आहे. ७२ वर्षांपूर्वी कोकणातून आलेले जनार्दनस्वामी यांनी घराघरांमध्ये योगाचा प्रचार व प्रसार केला. शाळा-कॉलेज, कार्यालये व प्रदर्शनींच्या माध्यमातून सर्वसामान्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्यामुळे हळूहळू इतरही लोक योगा शिकत गेले. त्यांनी पेरलेले योगारूपी बीज आज वटवृक्षात रूपांतरित झाले. मंडळाच्या माध्यमातून एक लाखांवर लोक योगा शिकले. पाचशेच्या वर योगा शिक्षक तयार झाले. आजच्या घडीला शहरात १०४ ठिकाणी बाराही महिने निःशुल्क योगाचे नियमित वर्ग चालतात. हे सर्व जनार्दनस्वामींमुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले.

खांडवेंचा सल्ला

  • योगा व प्राणायामसाठी कोणतेही विशिष्ट बंधन नाही

  • सर्वच वयोगटातील मुले, महिला व पुरुष मंडळींना शक्य

  • शक्यतो सकाळी उपाशीपोटीच योगासने करावी

  • शरीराला झेपेल तेवढीच आसने करावी

  • साधारणपणे आठ वर्षांनंतर प्राणायाम व मेडिटेशन आणि

  • १२ वर्षांनंतर आसने शक्य

  • किमान एक तास विविध आसने केल्यास निश्चितच खूप फायदा

  • एकाग्रता वाढत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त

शाळा-कॉलेजमध्ये `आवश्यक विषय` व्हावा

योगाचे फायदे लक्षात घेता, योगा हा विषय शाळा व महाविद्यालयांमध्ये अनिवार्य करावा, अशी इच्छा खांडवे यांनी व्यक्त केली. पण हा विषय ''पीटी''पुरता मर्यादित न राहता, त्याचा तरूणाईला कसा फायदा होईल, याचा विचार होणे खूप गरजेचे आहे. असे झाले तर निश्चितच भविष्यात सशक्त युवा पिढी घडू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com