esakal | किती भयंकर! पेट्रोलपंप संचालक चोवीस तास करवून घ्यायचा घरकाम, असा उघडकीस आला प्रकार

बोलून बातमी शोधा

Jabalpur's two sister persecuted for 15 years

मुलींना पाठविताना दरमहा पैसे पाठविण्याचेही ठरले. पण, काही महिने पैसे पाठविल्यानंतर पैसे पाठवणे बंद झाले. प्रारंभी फोनवरून आईचे बोलणे करून दिले जायचे त्यानंतर तेही बंद झाले. चिंताग्रस्त आईने मुलींचा बराच शोध घेतला. पण, तिला यश आले नाही.

किती भयंकर! पेट्रोलपंप संचालक चोवीस तास करवून घ्यायचा घरकाम, असा उघडकीस आला प्रकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील एका पेट्रोलपंप संचालकाने जबलपूरच्या दोन बहिणींना घरी आणले. मोठ्या मुलीला आपल्याकडे ठेवून घेतले तर धाकटीला घरकामासाठी पाठवून दिले. दोघींचाही अवांचित छळ करून विनामोबदला 24 तास राबवून घेतले जात होते. नागपूरच्या मुलीबाबत माजी नगरसेविका अश्‍विनी जिचकार यांना माहिती मिळाली. भरोसा सेलच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. पण, आरोपी पेट्रोलपंपाचा मालक अजूनही पोलिसांना गवसू शकला नाही. धाकट्या मुलीचीही अद्याप सुटका करता येऊ शकली नाही. 

पीडित बहिणी अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. मुलीची आई मोलकरणीचे काम करून संसाराला हातभार लावत होती. त्यातही भागत नसल्याने तिने मालकिणीकडे मुलींच्या भवितव्याबाबतची चिंता बोलून दाखवली. मालकिणीने दोघींनाही आपल्या मुलींकडे पाठविण्यासंदर्भात बोलणी केली. एकीला नागपूरच्या मुलीकडे तर दुसरीला आग्रा येथील मुलीकडे पाठवून दिले. त्यावेळी एकीचे वय 15 वर्षे तर दुसरीचे केवळ 11 वर्षांचे होते. 

क्लिक करा - मृत्यूपूर्वी लाडक्‍या "प्रिशा'ने का म्हटले "सॉरी'?

मुलींना पाठविताना दरमहा पैसे पाठविण्याचेही ठरले. पण, काही महिने पैसे पाठविल्यानंतर पैसे पाठवणे बंद झाले. प्रारंभी फोनवरून आईचे बोलणे करून दिले जायचे त्यानंतर तेही बंद झाले. चिंताग्रस्त आईने मुलींचा बराच शोध घेतला. पण, तिला यश आले नाही. मुलींनाही घरी परतणे शक्‍य होत नवते. नरकयातना सहन करीत दोन्ही बहिणी एक एक दिवस पुढे ढकलत होत्या. 

महिलेने शोधली चुलत बहीण

नागपूरच्या मुलीने घरी नियमित येणाऱ्या एका महिलेकडे आपल्या वेदना व्यक्त केल्या. नागपूरच्या मोतीबाग परिसरात चुलत बहीण राहते एवढेच तिला आठवत होते. तेवढ्याच माहितीच्या आधारे महिलेने बहिणीला शोधून काढले. तिच्या मध्यस्थीनेच दोघींचे बोलणे झाले. चुलत बहिणीने तिला सोडविण्याचे प्रयत्न सुरू केले. 

पोलिस आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हा दाखल

महिला व चुलत बहिणीने अश्‍विनी जिचकार यांना भेटून माहिती दिली. जिचकार यांच्या पाठपुराव्यामुळे भरोसा सेलने मुलीची सुटका करून आईच्या ताब्यात दिले. भरोसा सेलने मुलीचे वैद्यकीय परीक्षण करवून घेतले नाही किंवा गुन्हाही नोंदविला नाही. यामुळे पोलिस आयुक्तांची भेट घेतली. त्यांच्या आदेशावरून जरीपटका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण, अजूनही पेट्रोलपंप चालक पोलिसांना गवसला नाही. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. सुटका केलेल्या पीडितेला बहिणीबाबत चिंता आहे. धाकटी बहीणही अडचणीत असून, तिलाही नरकातून बाहेर काढण्याची पीडितेची मागणी आहे.