esakal | कोरडी आत्महत्येच्या निमित्ताने! हे काही आयुष्यावर फुली मारण्याचे वय नव्हते
sakal

बोलून बातमी शोधा

Rane Family

एक छायाचित्र हजार प्रभावी शब्दांचे काम करते असे म्हणतात. पण या छायाचित्राने हजार छळणारे प्रश्न उभे केले आहेत. हे प्रश्न कुण्या व्यवस्थेविरुद्धचे नाहीत तर जगण्यावर किंबहुना आनंदी जगण्याच्या विचारावर, जीवनेच्छेच्या छाताडावर पाय ठेवून उभे झाले आहेत.

कोरडी आत्महत्येच्या निमित्ताने! हे काही आयुष्यावर फुली मारण्याचे वय नव्हते

sakal_logo
By
किशोर जामकर

नागपूर : कोराडीतील उच्चशिक्षित दाम्पत्याने पोटच्या दोन निरागस कळ्यांसह आत्मघात करण्याची घटना निव्वळ अस्वस्थ करणारी नाही तर प्रचंड हादरवून टाकणारी आहे. या चौघांचे हसणे कॅमेराबद्ध करणारे छायाचित्र तर अधिकच धक्कादायक आहे.

एक छायाचित्र हजार प्रभावी शब्दांचे काम करते असे म्हणतात. पण या छायाचित्राने हजार छळणारे प्रश्न उभे केले आहेत. हे प्रश्न कुण्या व्यवस्थेविरुद्धचे नाहीत तर जगण्यावर किंबहुना आनंदी जगण्याच्या विचारावर, जीवनेच्छेच्या छाताडावर पाय ठेवून उभे झाले आहेत.

४२ (प्रा. धीरज राणे), ३८ (डॉ. सुषमा), १२ (धृव), ९ (लावण्या) हे काही आयुष्यावर फुली मारायचे वय नाही. तसा विचार केला तर कोणतेही वय आयुष्याला कंटाळण्याचे नाही पण तरीही असे वारंवार होते, हे वास्तव हृदयाला चरे पाडणारे आहे.
पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं
आज भेटलेल्या आपल्याला अगदी नॉर्मल दिसणाऱ्या, अगदी नॉर्मल भासणाऱ्या व्यक्तीच्याा मनात उद्या आत्मघात करण्याचा विचार लपलेला आहे हे कळत नाही, ही जाणीव तर मन विषण्ण करणारी आहे. आनंदी दिसणे आणि आनंदी राहणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणूनच आपण सारे आनंदी दिसण्याला फसतो, असेच म्हणावे लागेल. समोरचा आनंदी दिसतोय पण तो खरेच आनंदी आहे काय, याची खोलात जाऊन चाचपणी आपण करत नाही. ती प्रयत्नपूर्वक करायला हवी.

या दाम्पत्याच्या मनातील विचार कुणालाच कळले नाही आणि कळले असले तर कुणी काही करू नये, हेही तेवढेच वेदनादायी. दररोज कणाकणाने मरणाऱ्या प्राध्यापक नवऱ्याची दयनीय अवस्था बघून त्याच्या वेदना मी संपवल्या असा विचार डॉक्टर पत्नीने इंजेक्शन देण्यापूर्वी करणे. आपल्यानंतर मुलांचे काय होणार या विचाराने त्यांनाही मृत्यूच्या दाढेत लोटून मग गळफास घेणे अशी कृती या माऊलीने केली. हे सारे करत असताना आनंददायी आयुष्य जगण्याची संधी आहे आणि ती आपल्याच हाती आहे असा सारासार विचार करण्याच्या पलीकडे तिच्या मनाची अवस्था का गेली.

तीळ-तीळ मरण्यापेक्षा तीळ-तीळ जगणे अधिक चांगले, अधिक आनंददायी आहे असे तिला का वाटले नाही. या दाम्पत्याने एवढ्या टोकाचा निर्णय घ्यावा, असे त्यांच्या जीवनात घडले तरी काय होते, हे प्रश्न साहजिक उपस्थित झाले आहेत. या चौघांनी आत्मघात करण्याची कारणे पुढे येतील, ती एवढा टोकाचा निर्णय घेण्याच्या लायकीची होती काय याचीही चर्चा होईल.
पण आता प्रत्येकाने सावध होऊन आपण दररोज कणा-कणाने मरत आहोत काय याचाही विचार करायला हवा. याचे उत्तर होय असे असेल तर लगेच मदतीसाठी कुणाला तरी साद घालायला हवी.

रोजच्या साचेबद्ध व्यवहारात आपल्या प्राणतत्वाचे अवगुंठन होत आहे काय याचाही प्रत्येकाने विचार करायला हवा. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, आनंदी जगणे ही एक कला, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधला पाहिजे हे सांगणे, ऐकणे सोपे असले तरीही ज्यांची जीवनेच्छा पार चुरगळून गेली आहे अशांसाठी हा अपेक्षांचा भलामोठा पर्वत असू शकतो, हे ध्यानात घ्यायला हवे. मुळात ज्यांना जगणे हीच एक शिक्षा वाटते त्यांना यातून बाहेर काढणे मोठे जिकिरीचे काम आहे. तशी व्यवस्था आपल्या कुटुंबात, मित्र मंडळात, समाजात आहे काय हे ज्याचे त्याने तपासायचे आहे. कारण प्रत्येकाला कधी ना कधी निराशेचा सामना करावाच लागतो. त्यातून बाहेर पडणारे कुणी खंबीर असतात तर काही जे सशाच्या काळजाचे असतात त्यांना जगण्यापेक्षा जीवन संपवणे सोपे, सोयीस्कर वाटते. असा विचार करू नये हे सांगणे सोपे आहे, तसे सांगितलेही जाते पण तरीही अनेकांना ते वळत नाही हे वास्तव अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटना ठळकपणे अधोरेखित करीत असतात.

जगण्याच्या रहाटगाडग्यात एखाद्याचे जगणे मशीनवत होणे ही कदाचित आत्मघाताचा विचार येण्याची पहिली पायरी असावी. ज्यांचा रोजचा दिवस सारखाच असेल आणि त्यात काहीच नावीन्य नसेल तर अशांनी वेळीच सावध व्हावे. कुण्या अद्भूत शक्तीच्या परीसस्पर्शाने परिस्थिती बदलेल आणि त्यातून दिव्यत्वाचा अंश आपल्या हृदयी प्रकाशमान होईल, या अपेक्षेत असलेल्यांनीही सावध व्हावे. कारण आनंदी जगण्यासाठीचा बदल आपोआप होणारा नसून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात हे प्रत्येकाला ध्यानात ठेवावेच लागेल.

रोजचा दिवस सारखाच असेल आणि नेमक्या वेळी, नेमक्या क्रिया होत असतील तर बुद्ध्या त्यात बदल करावा लागेल. त्यात बदल करता येतो पण त्यासाठी आपल्यात बदल करण्याची गरज आहे याचे भान जागृत होणे गरजेचे आहे. यात सगळ्या प्रकारची मदत करणारी व्यवस्था आहे. गरज आहे ती आपण तिथपर्यंत पोहोचण्याची. जीवनसंघर्ष ही एकट्यानेच लढायची लढाई नाही. त्यात आपले कुटुंबीय, सगेसोयरे सारे आहेत आणि ते कसे असतील याची काळजी प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. प्रसंगी त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील.

जे अबोल (जसे प्रा. धीरज होते) वा लाजरेबुजरे, एखाद्या गटात मागे राहणारे असतील त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागेल. आपल्या अवतीभोवती असे अनेक अस्वस्थ अश्वत्थ असतात. काही सहजपणे ओळखू येतात तर काही वरवर आनंदी दिसूनही आतून पोकळ असतात. अशांची एक समाज म्हणून आपण काळजी घेत नाही तोपर्यंत अशा घटनांची मालिका खंडीत होण्याची शक्यता नाही.

संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top