Nagpur Weather : विदर्भात पावसाची सरासरीपार...‘ला निना’ची मेहरबानी : शेतकरी खुश, अवकाळीचीही शक्यता

Nagpur Weather : विदर्भात पावसाची सरासरी पार झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल वाढले आहे, तसेच बंपर उत्पादनाची शक्यता वर्तवली जात आहे. ‘ला निना’च्या प्रभावामुळे येत्या महिन्यात अवकाळी पावसाचीही अपेक्षा आहे.
Nagpur Weather Update
Nagpur Weather UpdateSakal
Updated on

नागपूर : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत वरुणराजाने यंदा विदर्भात सर्वत्र दमदार हजेरी लावली. नागपूरसह संपूर्ण विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसल्याने यावेळी धरणे तुडुंब भरली. अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने बंपर उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाचा खरिपासोबतच रब्बी पिकांनाही खूप फायदा होणार आहे.

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनची परतीच्या दिशेने वाटचाल सुरू असून, लवकरच विदर्भातूनही मॉन्सून निरोप घेण्याची शक्यता आहे. मॉन्सून विदर्भातून अद्याप माघारी परतला नसला तरी, अधिकृत पावसाळा मात्र संपलेला आहे. चंद्रपूरचे हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत नागपुरात एकूण १०२५ मिमी पाऊस बरसला, जो सरासरी पावसाच्या (९२० मिमी) ९५ मिमी अधिक आहे. तर विदर्भाचा विचार केल्यास, अकरा जिल्ह्यांमध्ये एकूण १०२९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

उल्लेखनीय म्हणजे, विदर्भात दरवर्षी सरासरी ८९४ मिमी पाऊस पडत असतो. मॉन्सून यंदा महाराष्ट्रावरही चांगलाच मेहरबान राहिला आहे. राज्यात सरासरीपेक्षा (९२७ मिमी) अधिक ११५३ मिमी पाऊस कोसळला. भारतातही आठ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भात वाशीम व अमरावती या दोन जिल्ह्यांमध्येच सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्यात आली.

१७ जूनला मॉन्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला पावसाने थोडासा दगा दिला. मात्र त्यानंतर तीन महिने जोरदार बरसल्याने पावसाचा संपूर्ण बॅकलॉगच भरून निघाला. चारही महिन्यांचा विचार केल्यास, जूनमध्ये केवळ १४५ मिमी पाऊस पडला होता. त्यानंतर जुलै महिन्यात ४८५ मिमी, ऑगस्टमध्ये १८२ मिमी आणि सप्टेंबरमध्ये ३१५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ‘ला निना’च्या अनुकूल प्रभावामुळेही यावर्षी वरुणराजा विदर्भावर अधिक मेहरबान राहिल्याचे प्रा. चोपणे यांनी सांगितले.

अवकाळीही बरसणार

देशात ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मॉन्सूनोत्तर (अवकाळी) पाऊसही चांगला बरसणार असल्याचे भारतीय हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे विदर्भ व महाराष्ट्रातही पुढील तीन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची दाट शक्यता आहे.

महत्वाची आकडेवारी

  • नागपुरात जूनमधील पाऊस -१४५ मिमी

  • जुलै महिन्यातील पाऊस -४८५ मिमी

  • ऑगस्टमधील पाऊस -१८२ मिमी

  • सप्टेंबर महिन्यातील पाऊस -३१५ मिमी

विदर्भातील एकूण पाऊस जिल्हा सरासरी पाऊस एकूण पाऊस

  • नागपूर ९२० मिमी १०२५ मिमी

  • अमरावती ८६२ मिमी ८१० मिमी

  • अकोला ६९३ मिमी ८११ मिमी

  • वर्धा ८७४ मिमी १११६ मिमी

  • भंडारा ११५७ मिमी १२३२ मिमी

  • गोंदिया १२२० मिमी १३५८ मिमी

  • चंद्रपूर १०८४ मिमी १२७४ मिमी

  • गडचिरोली १२५४ मिमी १६५५ मिमी

  • वाशिम ८८९ मिमी ८१० मिमी

  • यवतमाळ ८०५ मिमी ९८४ मिमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com