नागपूरकर लक्ष्मणचे हस्ताक्षर जगात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Handwriting

हस्ताक्षर म्हटले की आजही आठवतात ते बाल वयात रेघोट्या ओढत मोठ्यांकडून होणारे संस्कार. अक्षरांना वळण मिळावे म्हणून पालकांपासून शिक्षकांपर्यंत प्रत्येकाने आजच्या पिढीवर मेहनत घेतली आहे.

Laxman Bavankule : नागपूरकर लक्ष्मणचे हस्ताक्षर जगात प्रथम

नागपूर - हस्ताक्षर म्हटले की आजही आठवतात ते बाल वयात रेघोट्या ओढत मोठ्यांकडून होणारे संस्कार. अक्षरांना वळण मिळावे म्हणून पालकांपासून शिक्षकांपर्यंत प्रत्येकाने आजच्या पिढीवर मेहनत घेतली आहे. याचेच फलित म्हटले तर नागपूर जिल्ह्यातील (कोराडी) रहिवासी लक्ष्मण बावनकुळे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या हस्ताक्षर स्पर्धेमध्ये कलात्मक हस्ताक्षर प्रकारात बाजी मारत जगातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

लक्ष्मणचे आई-वडील दुर्दैवाने लहानपणीच वारले. त्यानंतर, त्याच्या मामाने त्याला लहानाचे मोठे केले. तर, आजीने प्रोत्साहन देत त्याला अभियंता बनण्यासाठीचा मार्ग सुकर केला. आई-वडील नसतानाही खचून न जाता त्याने मोठी मजल मारीत कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात सहाय्यक अभियंता पदावरची नोकरी मिळविली. सध्या विद्युत केंद्र परिसरातील वसाहतीमध्ये तो वास्तव्यास आहे. लहान पणा पासूनच आखीव, रेखीव आणि सुवाच्च अक्षरांमध्ये लिहिणे ही त्याची आवड.

जागतिक हस्ताक्षर स्पर्धेच्या अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थीत आंतरराष्ट्रीय मुख्यालयाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जोडून लिहिलेले हस्ताक्षर, कलात्मक हस्ताक्षर, हस्तलिखित हस्ताक्षर अशा विविध श्रेणीमध्ये या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्याची निवड झाल्याचे स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी केट ग्लॅडस्टोन यांनी ई-मेलद्वारे कळविले आहे. लक्ष्मण याने २० ते ६४ वयोगटातून कलात्मक हस्ताक्षर प्रकारामध्ये सहभाग घेत संपूर्ण जगातून पहिला क्रमांक प्राप्त केला. पेन संच, प्रशस्तिपत्र, रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढील महिन्यामध्ये पारितोषिक वितरण असणार आहे.

उजव्या हातांना बोटे नसूनही कौशल्य

२०१९ आणि २०२१ सालीसुद्धा त्याने भाग घेतला होता. यामध्ये, सर्व श्रेणीतून तो सर्वोत्तम ठरला होता. यंदा तिसऱ्या वर्षीसुद्धा त्याने जगातून बाजी मारल्याने आयोजकांनी त्याचे कौतुक करीत ‘लाइफ टाईम क्राऊन विनर’ म्हणून उल्लेख केला आहे. जन्मत: उजव्या हाताने अधू असलेला लक्ष्मण डाव्या हाताने लिखाण करतो, हे विशेष. उजवा हाताची आणि दोनही पायांची बोटे त्याला नाही.

टॅग्स :NagpurWorldworld ranking