नागपूरचा लक्ष्मण जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

नागपूर : रामायणातील कथेत भगवान लक्ष्मणाने आखलेली रेखा सर्वश्रुत आहे. आता नागपूर जिल्ह्यातील (कोराडी) लक्ष्मणच्या रेखेने सातासमुद्रापार डंका वाजविला आहे. जागतिक हस्ताक्षर स्पर्धेमध्ये (International handwriting competition) कलात्मक हस्ताक्षर प्रकारात लक्ष्मण बावनकुळे (Laxman Bawankule) याने संपूर्ण जगातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. संगणकाच्या या युगात लक्ष्मणच्या हस्तलिखित या अक्षरांमुळे जिल्ह्याची मान उंचावली आहे.

लक्ष्मणचे हस्ताक्षर

लक्ष्मणचे हस्ताक्षर

लक्ष्मणचे आई-वडील दुर्दैवाने लहानपणीच वारले. त्यानंतर, त्याच्या मामाने त्याला लहानाचे मोठे केले. तर, आजीने प्रोत्साहन देत त्याला अभियंता बनण्यासाठीचा मार्ग सुकर केला. आई-वडील नसतानाही खचून न जाता त्याने मोठी मजल मारीत कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावरची नोकरी मिळविली. सध्या विद्युत केंद्र परिसरातील वसाहतीमध्ये तो वास्तव्यास आहे. लहान पणा पासूनच आखीव, रेखीव आणि सुवाच्च अक्षरांमध्ये लिहिणे ही त्याची आवड.

जागतिक हस्ताक्षर स्पर्धेच्या अमेरिकेतील न्यूयॉर्कस्थीत आंतरराष्ट्रीय मुख्यालयाकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जोडून लिहिलेले हस्ताक्षर, कलात्मक हस्ताक्षर, हस्तलिखित हस्ताक्षर अशा विविध श्रेणीमध्ये या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्याची निवड झाल्याचे स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी केट ग्लॅडस्टोन यांनी ई-मेलद्वारे कळविले आहे. लक्ष्मण याने २० ते ६४ वयोगटातून कलात्मक हस्ताक्षर प्रकारामध्ये सहभाग घेत संपूर्ण जगातून पहिला क्रमांक प्राप्त केला. पेन संच, प्रशस्तिपत्र, रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी, २०१९ सालीसुद्धा त्याने भाग घेतला होता. यामध्ये, सर्व श्रेणीतून तो सर्वोत्तम ठरला होता.

लहानपणी सुंदर दिसणाऱ्या हस्ताक्षरांचा मला मोह जडला. त्याचे निरिक्षण करून-करून मी गिरवायला लागलो. महाविद्यालयीन जीवनात विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे सुरू केले. अशातच, या जागतिक स्पर्धेबाबत माहिती मिळाली.
-लक्ष्मण बावनकुळे
टॅग्स :Nagpur