Legislative Council Elections : काँग्रेसकडून राजेंद्र मुळक मैदानात! नाव घोषित होण्याची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrashekhar Bawankule and Rajendra Mulak

काँग्रेसकडून राजेंद्र मुळक मैदानात! नाव घोषित होण्याची प्रतीक्षा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

टीम ई सकाळ

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून राज्याचे माजी ऊर्जामंत्री व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र, कॉंग्रेसने उमेदवाराची घोषणा केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रसचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव जवळपास निश्‍चित झाल्याचे समजते. शनिवारी दुपारपर्यंत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना मैदानात उतरवल्यामुळे त्यांच्यावर २०१९ मध्ये झालेला अन्याय धुऊन निघणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतरही चंद्रशेखर बावनकुळे थांबले नाही. पक्षाच्या प्रत्येक कामात व्यस्त राहिले. या काळात अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले आणि श्रेष्ठींच्या विश्‍वासावर खरे उतरले.

पक्षाप्रति निष्ठा बघून श्रेष्ठींना चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी द्यावी लागली. तिकडे कोराडीला शुक्रवारपासून बावनकुळे यांच्या चाहत्यांनी गर्दी करणे सुरू केले. साहेब पुन्हा आमदार होणार, हा आनंद साजरा करण्यात कार्यकर्ते दंग झाले आहेत. विधान परिषदेचे विद्यमान सदस्य गिरीष व्यास यांचा कार्यकाळ संपत आला आहे.

बावनकुळेंसाठी निवडणूक सोपी

निवडणुकीचा विचार करता भाजपकडे बळ अधिक आहे. या निवडणुकी ५६२ मतदार मतदान करणार आहेत. यात महानगरपालिकेचे १५६, जिल्हा परिषदेचे ५८ आणि नगरपंचायतीचे तीन सदस्य सहभागी होणार आहेत. महानगरपालिकेत १५६ पैकी १०५ सदस्य भाजपचे आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची बेरीज केल्यावर भाजपकडे ६४ मते जास्त आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंना ही निवडणूक सोपी असल्याचे दिसते.

मुळक यांच्या नावाची जोरदार चर्चा

कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. परंतु, अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्याच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही. कॉंग्रेसमध्ये ऐन वेळेवर काहीही होऊ शकते. शेवटच्या दोन मिनिटांत उमेदवार बदलल्या गेल्याचेही जनतेने बघितले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवार घोषित होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

loading image
go to top