Amravati : ३५ घटनांमध्ये ४० लाखांचे नुकसान ; राजेंद्र सिंह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

३५ घटनांमध्ये ४० लाखांचे नुकसान ; राजेंद्र सिंह

अमरावती : शहरात निदर्शने व बंदच्या आवाहनानंतर उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीनंतर दोन दिवसांमध्ये ३५ गुन्हे दाखल करण्यात आले. जाळपोळ व तोडफोडीच्या ज्या घटना शहरात घडल्या त्यात जवळपास ४० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी (ता. १६) पत्रपरिषदेत दिली.

आयुक्तालयाच्या हद्दीत जाळपोळ, दगडफेकीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी डॉ. राजेंद्र सिंह चार दिवसांपासून शहरात डेरेदाखल आहेत. त्यांनी प्रथमच आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह उपस्थित होत्या. शुक्रवारच्या (ता. १२) निदर्शनानंतर हिंसाचार सुरू झाला. त्यात पहिल्याच दिवशी ११ तर, शनिवारी (ता. १३) एकूण २४ असे आतापर्यंत ३५ एफआयआर दाखल करण्यात आले. संचारबंदीत सोमवार व मंगळवार दुपारी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, डेअरी, किराणा दुकानांसाठी दुपारी दोन ते चार असे दोन तास संचारबंदीत शिथिलता दिली होती. बुधवारपासून (ता. १७) परिस्थिती बघून संचारबंदीत अधिक शिथिलता देण्याबाबत विचार करू, असे त्यांनी सांगितले.

आयुक्तालयातील इंटरनेट सेवा गृहविभागाच्या आदेशावरून बंद केल्यानंतर काही ठिकाणी नेट सुरू होते. त्यामुळे काही भागातून सोशल मीडियावरून काही मॅसेज हिंसाचाराच्या घटनेनंतर व्हायरल झाले. त्यातून पुन्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली. त्यासंदर्भात विचारणा केली असता, त्यावर त्यांनी विविध माध्यमातून जो अपप्रचार केला त्या मॅसेजची चौकशी होईल, असे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

अमरावती शहरात रझा अकादमीने १२ नोव्हेंबरच्या निदर्शनाची परवानगी घेतली नाही. संयुक्तपणे हे आयोजन झाले. रझा अकादमीची शहरात कुठेही शाखा नाही.

- डॉ. आरती सिंह, पोलिस आयुक्त, अमरावती शहर

शहरात पुरेसे संख्याबळ

कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी एसआरपीएफ, शहर पोलिसांसह जवळपास अडीच हजारांवर कर्मचारी अधिकाऱ्यांची शहरा तैनाती असून, हे संख्याबळ परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेसे असल्याचे अपर पोलिस महासंचालक डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

loading image
go to top