

Maharashtra Tiger Census
esakal
नागपूर : अखिल भारतीय व्याघ्र गणना अंतिम टप्प्यात आली असून महाराष्ट्रातील सुमारे ९० टक्के गणनेचे काम पूर्ण झाले आहे. राज्यातील १३ वन विभागांमध्ये गणनेदरम्यान काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने संबंधित भागांत पुन्हा गणनेचे काम सुरू आहे. उर्वरित विभागांमध्येही गणना पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर संकलित माहितीच्या आधारे राज्यातील वाघांची संख्या निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
महाराष्ट्र वन विभागाने आतापर्यंत संकलित झालेल्या सुमारे ९० टक्के गणनेची माहिती महिनाभरापूर्वी भारतीय वन्यजीव संस्थेकडे (डब्ल्यूआयआय) पाठविली आहे. मात्र, वर्धा, गोंदिया, अहिल्यानगरसह काही वन विभागांतील गणना अद्याप पूर्ण झालेली नाही. तांत्रिक त्रुटी दूर करून या भागातील गणना निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. गणनेच्या पहिल्या टप्प्यात वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर वाघांच्या हालचालींच्या नोंदी अन्य पुरावे, छायाचित्रे आणि कॅमेरा ट्रॅपमधून मिळालेली माहिती संकलित करण्यात आली.
वन कर्मचाऱ्यांसोबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीही या प्रक्रियेत सहभाग घेतला. राज्यातील व्याघ्र प्रकल्पांपुरती गणना मर्यादित न ठेवता अभयारण्ये, संरक्षित क्षेत्रे आणि प्रादेशिक वनक्षेत्रांमध्येही वाघांची तसेच तृणभक्षी वन्यजीवांची नोंद घेण्यात आली आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर, मेळघाट आणि सह्याद्री या व्याघ्र प्रकल्पांसह अन्य वनक्षेत्रांचाही त्यात समावेश आहे. २०१८ नंतर नागपूर वनवृत्तासह राज्यातील अनेक भागांत व्यापक स्वरूपात व्याघ्र गणना होत असल्याने यंदाच्या आकडेवारीकडे वन्यजीव क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या ६५०च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. मात्र, कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रांचे प्रमाणीकरण, पुनरावृत्ती टाळून केले जाणारे विश्लेषण आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या पडताळणीनंतरच अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे. गणनेत प्रौढ वाघांसोबत बछड्यांचीही नोंद केली जात असल्याने राज्यातील वाघांची संख्या, प्रजनन आणि अधिवासाची स्थिती याबाबत अधिक स्पष्ट चित्र उपलब्ध होणार आहे. देशाची अंतिम व्याघ्र गणना पुढील वर्षी व्याघ्र दिनाच्या दिवशी जाहीर होण्याची शक्यता आहे.
"राज्यातील ८५ ते ९० टक्के व्याघ्र गणनेचे काम पूर्ण झालेले आहे. १३ विभागाच्या कामात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांना पुन्हा गणना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ३१ ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्यावर भर आहे."
- मुकुल त्रिवेदी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.