
नागपूर : ‘साई’च्या जागेवरील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करा- गडकरी
नागपूर - ‘साई’च्या (स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडिया) जागेवर ज्यांनी घरे बांधली आहेत, अशा घरमालकांना महापालिकेने पर्यायी व्यवस्था करून द्यावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना शनिवारी दिले. आयुक्तांनी हा पर्याय मान्यही केला. ‘साई’ची जागा ही नासुप्रची आहे. या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, वसतिगृह होणार आहे. ही जागा विकसित करण्यासाठी नासुप्रने मनपाला हस्तांतरित केली आहे. ११५ एकर जागेपैकी ८७ एकर जागा सध्या मनपाच्या ताब्यात आहे. या जागेला संरक्षण भिंत उभारण्यात येत असून या भिंतीचे काम गतीने करण्याचे निर्देशही गडकरी यांनी दिले.
या जागेचे प्लॉट पाडून परस्पर विकण्यात आले. ६०० जणांजवळ या भूखंड विकत घेतल्याची रजिस्ट्री असल्याचे समजते. यापैकी सुमारे ६० ते ७० जणांनी घरेही बांधली आहेत. अतिक्रमित जागा म्हणून अतिक्रमण कारवाई करण्याची वेळ आली तेव्हा काही जण न्यायालयात गेले. न्यायालयाने यावर ‘जैसे थे’चे आदेश दिले. त्यामुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबली. न्यायालयाचे आदेश उठविण्याचे प्रयत्न सुरू असून ते आदेश उठताच ही कारवाई केली जाईल. संरक्षण भिंतीचे ७० टक्के काम झाले असून ३० टक्के भिंत पूर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. ज्या सरकारी जागा सरकारी विभागांना देण्यात आल्या. त्या जागा संबंधित विभागाच्या नावाची नोंदणी महिनाभरात करण्यात यावी, अशी सूचनाही ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना याप्रसंगी केली. ‘साई’च्या या जागेवर आधी मूळ मालकाने बांधकाम केले, त्यानंतर सोसायटीने व नंतर ज्यांनी भूखंड विकत घेतला त्यांनी बांधकाम केल्याचे आढळते. न्यायालयाचा जैसे थे चा आदेश उठविल्यानंतर पोलिस संरक्षणात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
Web Title: Make Alternative Arrangements Of Residents On Sports Authority Of India Land Gadkari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..