साहेब, उद्धव ठाकरे यांना सोबत घ्या; राज यांना कार्यकर्त्यांची विनंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS Raj Thackeray nagpur visit

साहेब, उद्धव ठाकरे यांना सोबत घ्या; राज यांना कार्यकर्त्यांची विनंती

नागपूर : उद्धव ठाकरे उत्तम मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळही चांगला होता. त्यांना सोबत घ्या, अशा सूचना जिल्ह्यातील काही मनसैनिकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आज केल्या. राज ठाकरे यांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदार संघातील अगदी शाखा प्रमुख, कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. मतदार संघातील अडचणींसह सूचना प्रत्यक्ष राज ठाकरे यांनी ऐकूण घेतल्याने कार्यकर्त्यांत उत्साह संचारला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे आज सकाळी रेल्वेने नागपुरात आगमन झाले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. आगमनानंतर काही वेळातच त्यांनी रविभवन गाठले. प्रमुख पदाधिकाऱ्यांशिवाय केवळ कार्यकर्त्यांनाच भेटणार असल्याने सकाळपासून रविभवनात गर्दी झाली. ऐरवी रविवारी शांत असलेले रविभवन आज चांगलेच गजबजले. शहरातील पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य, दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ तर ग्रामीणमधील सावनेर, रामटेक, काटोल, उमरेड, हिंगणा, कामठी मतदार संघातील कार्यकर्ते, शाखा प्रमुखासोबत राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.

सुरुवातीला त्यांनी शहरातील सहा मतदार संघातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी एकापाठोपाठ चर्चा केली. त्यानंतर ग्रामीणमधील सहा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत घ्या, अशी सूचना केली. यावर ते हसल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी पक्ष वाढविण्यात काय अडचणी येत आहेत, याबाबत कार्यकर्त्यांना विचारणा केली. यावर मतदार संघनिहाय कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदार संघातील अडचणी सांगितल्या.

राज ठाकरे यांनी त्यांना अडचणीवर मात करण्यासाठी काय करता, असा प्रश्नही उपस्थित केला. शहरातील सहा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत त्यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली. महापालिका निवडणुकीसाठी आणखी तीन महिन्यांचा काळ असल्याने आतापासून जोमाने कामाला लागा, अशा सूचना त्यांनी दिल्या. महापालिकेची निवडणूक मोठी संधी असल्याचे त्यांनी शहरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, शहर अध्यक्ष अजय ढोके, शिरीष पटवर्धन, तुषार गिऱ्हे, प्रशांत निकम आदी शहरातील पदाधिकारीही वेगवेगळ्या बैठकांना उपस्थित होते.

भाजपा प्रदेशाध्यक्षांना आज भेटणार

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील घरी राज ठाकरे उद्या सकाळी भेट देणार आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आले होते.

ॲड. निकम यांनी घेतली भेट

विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आज एका प्रकरणासंबंधी शहरात होते. त्यांनीही रविभवन येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील कळला नाही. परंतु या दोघांची भेट चर्चेचा विषय ठरली.

गडकरीसमवेत बघितले संगीतमय कारंजे

फुटाळा येथे तीन दिवसांपासून पाण्यावर तरंगणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या संगीतमय कारंज्याचा ट्रायल शो सुरू आहे. राज ठाकरे यांनी सायंकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत संगीतमय कारंजे बघण्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले.

Web Title: Mns Raj Thackeray Nagpur Visit Activists Uddhav Thackeray Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..