esakal | पोलिसांची लावला छडा; सोनेरी केस, कानातील बाळीने अडकले चोरटे
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांची लावला छडा; सोनेरी केस, कानातील बाळीने अडकले चोरटे

पोलिसांची लावला छडा; सोनेरी केस, कानातील बाळीने अडकले चोरटे

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : चोरट्यांनी शस्‍त्राच्या धाकावर रेल्वे प्रवाशाचा मोबाईल पळविला. आरोपींबाबत कुठलाही सुगावा पोलिसांकडे नव्हता. चोरट्यांपैकी एकाने डोक्यावरील केस सोनेरी करण्यासह कानात बाळी घातली होती. लोहमार्ग पोलिसांनी केवळ याच माहितीच्या आधारे केवळ सहा तासांमध्ये आरोपींना अटक करीत चोरीच्या घटनेचा उलगडा केला. राहुल हाटेवार (२५, रा. कुंदनलाल गुप्तानगर) आणि नरेंद्र ऊर्फ बाली बोकडे (२०, रा. राम मंदिर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. दोघेही पोलिस अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. (mobile-theft-Accused-arrested-Nagpur-crime-news-crime-news-nad86)

मिनीमातानगरातील रहिवासी आणि व्यवसायाने पेंटर असणारा ईश्वर कोठारी (२७) हा कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. बुधवारी सकाळी शिवनाथ एक्सप्रेसने इतवारी रेल्वे स्थानकावर आला. गाडीतून उतरल्यानंतर दोन युवक त्याच्या जवळ गेले. ऑटोरिक्षाबाबत विचारणा केली. ईश्वर ४० रुपयांत मिनीमातानगरपर्यंत जाण्यास तयार झाला. रिक्षा बाहेर असल्याने तिकडेच चलण्याचा आग्रह चोरट्यांनी धरला.

हेही वाचा: ‘...अन्यथा तुझ्या शरीराचे चार तुकडे करून चार राज्यात फेकून देईल’

इतवारी रेल्वे स्थानकासमोरील पुलाखाली जाताच त्याला मारहाण केली. ‘आम्ही शहराचे डॉन आहोत, पोलिसात तक्रार दिल्यास ठार करू’ अशी धमकी दिली. सोबतच चाकूच्या धाकावर त्याच्याजवळील १२ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून दोघेही पसार झाले. घाबरलेला ईश्वरही थेट घरी गेला. मित्रांना घटनेची माहिती दिली. मित्रांनी त्याला हिंमत देत पोलिसात तक्रार देण्यासाठी तयार केले.

चोरट्यांपैकी एकाने डोक्याच्या केसाला सोनेरी रंग लावला होता आणि कानात बाळी असल्याची माहिती ईश्वरने पोलिसांना दिली. त्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. चौकशीत संबंधित वर्णनाचा युवक कुंदनलाल गुप्तानगरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिस राहुलच्या घरावर धडकले. घरून त्याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून बालीलाही अटक करण्यात आली. त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

(mobile-theft-Accused-arrested-Nagpur-crime-news-crime-news-nad86)

loading image