esakal | "आई माझा गुरु आई कल्पतरू'उद्यापासून आई सन्मान अभियान
sakal

बोलून बातमी शोधा

ebooks-1.jpg

आई सन्मान अभियानाची सुरुवात मातृहृदयी सानेगुरुजी यांच्या 11जून 2020 रोजी स्मृतिदिनानिमित्त सुरू होणार असून सानेगुरुजींच्या 75 व्या स्मृतिदिनापर्यंत म्हणजे 11जून 2025 पर्यंत चालवण्यात येणार आहे.

"आई माझा गुरु आई कल्पतरू'उद्यापासून आई सन्मान अभियान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजीत असतात. त्यांना फुलवितात. झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. असा उपदेश करणारी श्‍यामची आई म्हणजेच सानेगुरुजींची आई त्यांच्या श्‍यामची आई या पुस्तकातून मराठी घराघरात पोहोचली. आईचे महात्म्य सांगणारे आईभक्‍त साने गुरुजी आणि त्यांची तत्वनिष्ठ आणि स्वाभिमानी आई मराठी मनांसाठी आदर्श आहे.
म्हणूनच मातृहृदयी सानेगुरुजी यांच्या 75 व्या स्मृतीदिनानिमित्त आई सन्मान अभियान सुरू करण्यात येत असून हे अभियान 5 वर्ष चालणार आहे. सानेगुरुजींच्या 75 व्या स्मृतिदिनानिमित्त 75 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल अंबिका भीमराज बुलबुले यांनी दिली.
प्रत्येकाला आपल्या आईबद्दल काही सांगायचे असते तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची असते. तिचा योग्य तो सन्मान त्याला करायचा असतो यासाठी त्याला योग्य निमित्त व योग्य जागा हवी असते. ती संधी व योग्य विचारपीठ ही संस्था सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहे.
आई सन्मान अभियानाची सुरुवात मातृहृदयी सानेगुरुजी यांच्या 11 जून 2020 या स्मृतिदिनी सुरू होणार असून सानेगुरुजींच्या 80 व्या स्मृतिदिनापर्यंत म्हणजे 11 जून 2025 पर्यंत चालविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत कविता स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, आयोजित करण्यात येणार आहेत. याच बरोबर विविध विषयांवर चर्चासत्रे, व्याख्याने, आयोजित केली जाणार आहेत.

सविस्तर वाचा - कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर अमरावतीत

आई या विषयावर कविता पोस्टर, प्रबोधन फलके, स्टीकर प्रकाशित करण्यात येणार आहेत. या अभियानात 75 पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अभियानात राज्यभरातील 1 हजार 875 मातांचा सन्मान होणार असून या मातांविषयीच्या आठवणी लिहिण्यात येणार आहेत. साधारणपणे सहा हजार पानांचा मजकूर असणार आहे. त्या सर्व आठवणी 75 पुस्तकातून प्रकाशित करण्यात येणार आहेत. प्रत्येक पुस्तक 80 पानांचे असणार आहे.
या प्रकल्पात सर्व क्षेत्रातील मान्यवर व सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.

11 जून 2020 ते 11 जून 2025 अशी पाच वर्षे हे अभियान चालवण्यात येणार आहे "आई माझा गुरु आई कल्पतरू' ही टॅग लाईन या अभियानासाठी वापरण्यात येणार आहे. या अभियानांत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी, सहकार्य करू इच्छिणाऱ्यांनी 9822672908 या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विचारधाराच्यावतीने करण्यात आले आहे.

loading image
go to top