नागपूर : संशयावरून सहकाऱ्याचा खून करून जाळले

विम्यासाठी ट्रकही पेटविला; तीन आरोपींना अटक
Murder
MurderSakal

खापरखेडा - माल लंपास करून ट्रकला पेटवून मिळालेल्या रकमेची वाटणी करण्याचा मनसुबा रचला. मात्र, वाटणीपूर्वीच सहकाऱ्यावर संशय घेऊन त्याचा खून करून पेटवून दिले. सहकारी कुठे गेला यावरून झालेल्या जबाबात पोलिसांनी हिसका दाखविताच खूनाचा प्रकार उघडकीस आला. खापरखेडा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

इटगाव, दिघलवाडी शिवारात एका अनोळखी युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी मृत युवकांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याची मोहीम उघडली. दरम्यान नागपुरातील पुनापुरा येथील नीतेश मुरलीधर सेलोकार बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी युवकाचे छायाचित्र दाखविले असता तो नीतेशच असल्याचे स्पष्ट झाले. नीतेशचा खून झाल्याचे पोलिसांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांसोबत चर्चा करून नीतेश कुठे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी घेतली. नीतेश ज्या ठिकाणी कामाला होता त्या ट्रक मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खून केल्याचे उघडकीस आले. आरोपी गिरिधारी ऊर्फ संजय सुखराम पारधी (वय ३५) रा. पारडी, चंद्रशेखर ऊर्फ गोलू जगन्नाथ साहू (वय २६) रा. ४७, माही कॉन्व्हेन्ट जवळ पारडी, अक्षय ऊर्फ कमांडो भगवान मसराम (वय २६) रा. रेल्वे क्रॉसिंग मिनी माता नगर यांना पोलिसांनी अटक केली.

विम्या रकमेतील वाटणीच्या संशयावरून केला खून

पारडी येथील गिरीधारी पारधी यांच्याकडे ट्रक आहे. या ट्रकवर नीतेश सेलोकार हा रोजंदारीने कामावर आहे. नागपूर येथून ट्रकमध्ये माल घेऊन नीतेश बिलासपूर येथे जाणार होता. दरम्यान १५ एप्रिल रोजी नीलेश हा १२ चक्का ट्रक घेऊन रायपूराला गेला. तेथील लोखंडी साहित्य भरून पिपरियाला जाणार होता. मात्र, ट्रक मालक आणि आरोपींना लालच सुटले. माल लंपास करून ट्रक पेटवून देण्याचा कट त्यांनी रचला. तसेच ट्रक पेटवून दिल्यानंतर मिळालेल्या रकमेतून समान वाटणी करण्याचे त्यांनी ठरविले. दरम्यान त्यांचा ट्रक देवरीजवळ नादुरुस्त झाला. त्याच्या दुरुस्तीकरिता तिन्ही आरोपी गेले. तेथे ट्रक जाळण्याचा कट रचल्यानंतर ट्रकमधील लोखंडी साहित्य कोलीतमारा येथील नातेवाईकडे ठेवण्यात आले. त्यानंतर रिकामा ट्रक घेऊन ते रावणवाडीच्या कच्चा रस्त्याने गेले आणि तेथे ट्रक पेटविण्यात आला. यानंतर त्यांच्या मनात नीतेश विषयी शंका निर्माण झाली. आपले बिंग हा फोडू शकते, यावर तिन्ही आरोपीचे एकमत झाले आणि त्यांनी नीतेशचा काटा काढण्याचे ठरविले. कामठी मार्गावरील पेट्रोलपंपवरून पेट्रोल घेऊन खापरखेड्याजवळील इटगाव शिवारात नीतेशचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. त्याच शिवारातील नीतेशच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आले. हे कृत्य करताना आरोपी संजय आणि गोलू यांच्या पायाला इजा झाली. बिंग फुटेल या संशयावरून नीतेशचा खून केल्याचे आरोपींना सांगितले. पोलिसांनी तिन्ही आरोपींनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात कामगिरी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com