
Nag Diwali : नागदिवाळी का साजरी केली जाते?
नागपूर : नागदिवाळीचे विदर्भासह महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मराठवाडा, कोकण, विदर्भात, ग्रामीण भागात हा सण साजरा केला जातो. शेतकरी वर्गात याचे विशेष महत्त्व आहे. खरिपाचे धान्य शेतकऱ्याच्या घरी आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्याशी याचा संबंध अनेक जण जोडतात.
भारताला सणांचा देश म्हटले जाते. येथे अनेक धर्माचे लोक राहतात. प्रत्येकाच्या चालीरीती वेगळ्या आहेत. काही मोठे सण सोडले तर सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा, चालीरीती आढळतात. यातील काही परंपरा इतक्या वेगळ्या आहेत की त्यांच्याबद्दल ऐकून आश्चर्य वाटते. या अनोख्या सणांपैकी एक म्हणजे नाग दिवाळी. यादिवशी आपल्या कुलदेवतेची पूजा करून गोड पदार्थ, पुरणपोळीचा नैवैद्य करतात. खरिपाची पिके घरी आल्यानंतर नव्या धान्याच्या तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा देवाला, आपल्या कुलदैवताला नैवैद्य दाखवितात.
साप, नागदेवतेला मानणाऱ्या विदर्भवासीयांमध्ये हा सण महत्त्वाचा असतो. कारण मध्यप्रदेशातील पचमढी येथील नागद्वार यात्रेला जाणारे मोठ्या प्रमाणात विदर्भात आहेत. त्यातच शेतकरी वर्गात हा सण साजरा करण्याविषयी वेगळी आस्था दिसून येते. पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे या सणाला पूजाविधी केले जातात. तसेच घरातील प्रत्येकाच्या आवडीचे पदार्थ गोडधोड या दिवशी तयार केले जातात. त्याचा नैवैद्य कुलदेवतेला व देवांना दाखविला जातो. काही जण या दिवशी नागपंचमीप्रमाणे व्रत व उपकरणे व अवजारे यांचा वापर टाळतात.
चमोलीत रहस्यमय मंदिर
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बन गावात नागदेवतेचे रहस्यमय मंदिर आहे. लोक जवळपास ८० फुटांवरून त्याची पूजा करतात. त्याचबरोबर मंदिराचे पुजारीही डोळ्यांवर व तोंडावर पट्टी बांधून पूजा करण्यासाठी मंदिरात जातात. हे मंदिर पार्वतीचा चुलत भाऊ लाटूच्या नावाने बांधले आहे. वैशाख पौर्णिमेला वर्षातून एकदा मंदिराचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. हे मंदिर समुद्रसपाटीपासून ८५०० फूट उंचीवर आहे.
विशेष म्हणजे विदर्भात आणि शेतकरी वर्गात या सणाचे वेगळे महत्त्व आहे. या काळात खरिपाची पिके निघालेली असतात. याच नव्या धान्याचा उपयोग करून या सणाचा स्वयंपाक केला जातो. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आवडीचे पदार्थ तयार केले जातात. या सर्व पदार्थांच्यावर पुरणाचा अथवा कणकीचा दिवा लावून त्याद्वारे देवाची कुलदैवताची पूजा केली जाते. नागपूर जिल्ह्यात व विदर्भात या सणाला पुरणपोळी करण्याची परंपरा आहे.
-शिरीष पटवर्धन गुरुजी, पुरोहित नागपूर