
Nagpur : डॉक्टर, माझ्या गर्भातील बाळ सुरक्षित आहे ना ?
नागपूर : हुक्का पार्लरवर एन्जॉय करणाऱ्या अनेक तरुणी मद्याच्या विळख्यात सापडतात. यातच अनेकींचे लग्न होते. आणि यानंतर तरुणींना आई होण्याची चाहुल लागताच भीती मनात दाटून येते. आणि मग
डॉक्टरांसमोर व्यसनाची कबुली देतानाच डॉक्टर माझ्या गर्भातील बाळ सुरक्षित तर आहे ना ? अशी विचारणा करताना अपराधीभाव त्यांच्या डोळ्यात असतो. लग्न झालेल्या अशा युवतींचे प्रमाण उपराजधानीत वाढत असून ही चिंतेची बाब असल्याचे मत वैद्यकीयतज्ज्ञ व्यक्त करीत आहे.
व्यसानाच्या आहारी गेलेल्या तरुणीं आई बनण्याची चाहुल लागताच प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञांकडे आल्यानंतर पहिल्या भेटीत डॉक्टर त्यांची संपूर्ण हिस्ट्री घेतात. ही माहिती घेताना सिगारेट, हुक्का, दारूचे व्यसन करणाऱ्या युवतींचा टक्का वाढल्याचे स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञ सांगत आहेत. शासकीय रुग्णालयातही व्यसनी मुलीवरील उपचाराचा टक्का वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रात्रीची वेळ होती. उच्चभ्रुंच्या पॉश वस्तीत राहणारी मुलगी. पालक गुंगीत असतानाच तिला डॉक्टरांकडे घेऊन आले. कोणती नशा केली होती, माहिती नव्हते. तिला कशाचीच शुद्ध नव्हती. नंतर प्रेमविवाहातून तिला नैराश्य आल्याची माहिती मिळाली. मुलगी व्यसनाच्या विळख्यात अडकल्याने आई-वडील हतबल झाले होते. डॉक्टर मुलीला वाचवा..एकुलती एक आहे, अशी विनवणी त्यांनी डॉक्टरांना केली. अखेर उपचारानंतर मुलगी व्यसनमुक्त झाली.
आईच्या व्यसनाचे दुष्पपरिणाम
वंध्यत्व येण्याची शक्यता
जन्मजात वजन कमी असण्याची शक्यता
बाळाच्या मेंदूवर आणि फुफ्फुसांवर परिणाम
जन्मानंतर नवजात बालकाच्या मृत्यूची शक्यता
मुलींच्या व्यसनाचा टक्का वाढला
२०१६ च्या सर्वेक्षणानुसार किशोरवयीन मुलींमध्ये व्यसनाच्या १.२ टक्के घटना आढळल्या.
२०२१ च्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण २.६ टक्क्यांवर पोहोचले.
मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण १ टक्का
२०२०च्या सर्वेक्षणातून हुक्का आणि सिगारेट घेणाऱ्या मुलींचे प्रमाण ९.२ टक्के आढळले