Nagpur : दाम दुप्पटचे आमिष दाखवून २० लाखांचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : दाम दुप्पटचे आमिष दाखवून २० लाखांचा गंडा

नागपूर : गुंतवणूक केल्यास दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना २० लाख रुपयांनी गंडा घातला. या प्रकरणी यशोधरा पोलिसांनी धकाते बंधुंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकाश लक्ष्मीकांत धकाते (३६), मनोज लक्ष्मीकांत धकाते (३९) दोन्ही रा. कुंदनलाल गुप्तानगर, प्लॉट नंबर ९२५, यशोधरानगर अशी आरोपींची नावे आहेत. तर शाहीन बानो मोहम्मद अन्सारी (३८) रा. वनदेवीनगर असे फिर्यादीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी वस्तीतील लोकांना विश्वासात घेऊन डेली कलेक्शन फंड स्कीम सुरू केली. या स्कीमला आर्यन प्रतिदिन फंड व आर्यन रिजर्व फंड हे नाव देऊन वस्तीतील लोकांना गुंतवणूक केल्यास अल्पावधीत दाम दुप्पट मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी आकर्षक पत्रकेही छापली. दोन्ही भावांना याचा प्रचार-प्रसार केला. नागरिक त्यांच्या आमिषाला बळी पडले. अनेक जण त्यांच्या गळाला लागले.

यामध्ये एक नाव फिर्यादीचे व त्यांच्या पत्नीचे आहे. या दोघांनी मुलाच्या नावाने दैनिक बचत खाते काढले. त्यात एकूण ८४ हजार ४०० रुपये जमा केले. तर वस्तीतील इतर गुंतवणूकदारांनीसुद्धा डेली कलेक्शन खाते उघडून एकूण २० लाख रुपये जमा केले. मात्र निर्धारित कालावधीत नफ्यासह रकम परत न करता फिर्यादीसह इतरांची त्यांनी फसवणूक केली. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित गुंतवणूकदारांनी यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. सदर प्रकरण वर्ष २०१६ ते वर्ष २०२२ दरम्यानचे आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी धकाते बंधुंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फसवणूक झालेल्यांपैकी बहुतांश मजूर वर्गातील असल्याची माहिती आहे.