नागपूरकरांचा मृत्यूच्या जबड्यातून प्रवास; दोन महिन्यात तिसऱ्या 'आपली बस'ला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bus Fire

नागपूर शहरातील नेते पर्यावरणपूरक वाहतुकीचा गाजावाजा करत असले तरी महापालिकेचा परिवहन विभाग त्याबाबत फारसा गंभीर नसल्याचे आज संविधान चौकात आणखी एक 'आपली बस'ला लागलेल्या आगीतून स्पष्ट झाले.

नागपूरकरांचा मृत्यूच्या जबड्यातून प्रवास; दोन महिन्यात तिसऱ्या 'आपली बस'ला आग

नागपूर - शहरातील नेते पर्यावरणपूरक वाहतुकीचा (Transport) गाजावाजा करत असले तरी महापालिकेचा परिवहन विभाग (Municipal Transport Department) त्याबाबत फारसा गंभीर नसल्याचे आज संविधान चौकात आणखी एक 'आपली बस'ला (Aapli Bus) लागलेल्या आगीतून (Fire) स्पष्ट झाले. धावत्या बसला लागलेल्या आगीतून आज ३५ प्रवासी बचावले. गेल्या दोन महिन्यातील 'आपली बस'ला लागलेल्या आगीची तिसरी घटना आहे. खाजगी ऑपरेटर देखभाल, दुरुस्तीकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असून नागपूरकरांचा प्रवास मृत्यूच्या जबड्यातून होत असल्याचे या घटनेने अधोरेखित झाले.

महापालिकेच्या परिवहन विभागाची एमएच ३१ सीए ६०१०या क्रमांकाची आपली बस सकाळी सव्वा नऊच्या सुमारास सिताबर्डीतून खापरखेड्याकडे जाण्यास निघाली. सिताबर्डीतून दोन किमी अंतरही गाठले नाही, तोच संविधान चौकात या धावत्या बसने पेट घेतला अन् एकच खळबळ उडाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास बसने पेट घेतल्याने खापरखेड्याला नोकरीसाठी जाणारे कर्मचारी तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांत थरकाप उडाली. चालक किशोर भुते व वाहक गौरव कांबळे यांना आगीची चाहूल लागताच त्यांनी प्रवाशांना तातडीने बाहेर काढले.

इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसताच बसच्या दोन्ही प्रवेशद्वारातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या परिसरातील वाहतूक पोलिस, नागरिकांनीही प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. चालक व वाहकांच्या प्रसंगावधनामुळे ३५ प्रवाशांचा जीव वाचला. परंतु अनेक प्रवासी घटनेनंतर काही वेळ दहशतीत दिसून आले. बसमधील फोमच्या गाद्यामुळे आग संपूर्ण बसमध्ये पसरली.

दहा मिनिटांत संपूर्ण बसला आगीने कवेत घेतले. दरम्यान, जवळच असलेल्या महापालिकेच्या सिव्हिल लाईन अग्निशमन केंद्रावरून तत्काळ दोन बंब आले. अग्निशमन जवानांनी माऱ्याचा मारा करीत आग विझवली. परंतु संपूर्ण बसचा कोळसा झाल्याचे दिसून आले. आग विझविल्यानंतर बसचे केवळ टिनाचे पत्रे शिल्लक दिसून आले. जळालेल्या या बसमुळे तेथेच थांबलेले प्रवाशांतही भीतीचे वातावरण होते. गेल्या दोन महिन्यात धावत्या बसला आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे खाजगी ऑपरटेरने देखभाल, दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून नागपूरकरांचा जीव धोक्यात घातला असल्याचे दिसून येत आहे.

तीन घटनांत १३५ प्रवासी बचावले

धावत्या बसला आग लागल्याची मार्चपासूनची ही तिसरी घटना आहे. ८ मार्चला गिट्टीखदान येथे आपली बसच्या ताफ्यातील एमएच ३१ सीए ६१०२ क्रमांकाची बस जळाली. या बसमधील ५५ प्रवाशांचा जीव वाचला. ३१ मार्चला सकाळी पावणेदहा वाजताच्या सुमारास मेडिकल चौकातील संगम हॉटेलजवळ एमएच ३१ एससी ०४१३ क्रमांकाच्या बसला आग लागली. यातून ४५ प्रवाशांचा जीव वाचला तर आज ३५ प्रवासी बचावले.

बॅटरीतून स्पार्क?

बसला आग लागण्याची अनेक कारणे आहेत. यात बॅटरीतून स्पार्क निघत असताना त्यावर ऑईल पडल्याने आग लागण्याची शक्यता असल्याचे ट्रान्सपोर्ट व्यवसाय व दुरुस्ती करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले. शिवाय वाढलेल्या तापमानात लहान स्पार्कही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बॅटरीची तपासणी करण्याची गरज असल्याचेही या तज्ज्ञाने सांगितले.

अग्निशमन विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष

३१ मार्चला बसला आग लागल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी उपायुक्त व वाहतूक व्यवस्थापक रविंद्र भेलावे यांना लिहिलेल्या पत्रातून केली होती. इंजिन अति उष्ण होऊ नये, यासाठी ऑईल तसेच कूलंटची तपासणी नियमित करण्याची सूचना त्यांनी केली होती. प्रत्येक बसमध्ये अग्निशमन यंत्रणा आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु या सूचनाही हवेत उडविण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Nagpur Aapli Bus Fire 35 Passengers Life Saving

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top