नागपूर : दोन मित्र डोळ्यादेखत अंबाझरीत बुडाले

एकाला वाचविताना दुसऱ्यालाही जलसमाधी
Nagpur Ambazari Lake
Nagpur Ambazari Lake

नागपूर : जिवाभावाच्या चार मित्रांनी रविवार असल्याने फिरायला जाण्याचा बेत आखला. चौघेही अंबाझरी तलाव येथे फिरायला गेले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने परिसरात चिखल झाला होता. तलावाच्या भिंतीवर फिरल्यानंतर एकाची चप्पल चिखलाने भरली. ती धुण्यासाठी अंबाझरी तलावाच्या काठावर गेला. अचानक पाय घसरल्याने तोल जाऊन तलावात पडला. त्याला वाचविण्यात दुसऱ्याचाही पाय घसरला. दुर्दैवाने दोघांनाही जलसमाधी मिळाली. ही घटना आज, रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.

मिहीर शरद उके (२०) रा. मायानगर, इंदोरा आणि चंद्रशेखर किशोर वाघमारे (२०) रा. लष्करीबाग अशी मृतकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, मिहीर उके, चंद्रशेखर वाघमारे, अक्षय मेश्राम आणि बंटी हे चार मित्र फुटाळा परिसरात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास फिरायला गेले होते. काही वेळ तेथे घालविल्यानंतर चौघेही अंबाझरी तलाव परिसरात आले. तलाव परिसरातील ‘वॉकिंग ट्रॅक’वर काही वेळ फिरून घरी परत जात असताना मिहीर आणि चंद्रशेखरची चप्पल चिखलाने भरली. त्यामुळे दोघेही आपली चप्पल स्वच्छ करण्यासाठी तलावाच्या काठावर गेले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकमेकांचा हात पकडून ठेवला होता.

चप्पल धुताना चंद्रशेखरचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्याचा हात पकडून असल्याने मिहिरचाही तोल गेला. अखेर पोलिस आणि अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. अंबाझरी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. अग्निशमन पथकही पोहोचले. मात्र तोपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. मोठ्या प्रयत्नाने दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मिहीर आणि चंद्रशेखरच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. नाहक दोघांचा जीव गेल्याने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

मदतीसाठी आरडा-ओरड

मिहीर आणि चंद्रशेखर दोघेही पाण्यात पडून गटांगळ्या खाऊ लागले. मित्रांना बुडताना पाहून प्रशिक आणि अक्षय यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परिसरात असा कोणीही नव्हता ज्याला पोहता येत होते. त्यामुळे कोणीही मदतीला पुढे आले नाही. या घटनेमुळे प्रशिक आणि अक्षयला मोठा धक्का बसला आहे. डोळ्यादेखत त्यांचे दोन्ही मित्र पाण्यात बुडाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com