Nagpur : जनावरांचा अवैध कत्तलखाना उघड्यावर Nagpur animals open Illegal slaughterhouse Locals suffering | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कत्तलखाना

Nagpur : जनावरांचा अवैध कत्तलखाना उघड्यावर

बारासिंगल : गेल्या अनेक वर्षांपासून धंतोली झोनमधील बारासिंगल परिसरात रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर अवैधरीत्या कत्तलखाना सुरू आहे. उघड्यावरच जनावरे कापली जातात. त्यामुळे लगतच्या वस्तीतील नागरिकांना हा किळसवाणा प्रकार बघावा लागतो.

कत्तलखान्यातील घाण व मासांचे तुकडे परिसरात टाकले जात असल्याने वर्षभर नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कत्तलखान्याजवळच नाल्याचे घाण पाणीही वाहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या आहे. या परिसरातील नागरिकांनी धंतोली झोन कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी केल्या; परंतु महापालिकेने येथील नागरिकांना वाळीत टाकल्याचे दिसून येते. कत्तलखाना संचालकांकडून तक्रारकर्त्यांना धमकी दिली जात असल्याने स्थानिकांनी चुप्पी साधली आहे.

धंतोली झोनमध्ये जाटतरोडीला लागूनच बारासिंगल वस्ती आहे. ही वस्ती रेल्वे ट्रॅकला लागून आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला मोठी नाल्याप्रमाणेच मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत उघड्यावर जनावरांची कत्तल केली जाते. जनावरांचे कापलेले अवशेष परिसरात टाकले जात असल्याने परिसरात आरोग्याची समस्या मोठी आहे. या घाणीमुळे येथील लहान मुले कायम विविध आजारांनी ग्रस्त असतात, असे येथील नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

नाल्यात हाडे, मांसाचा खच

जवळून वाहत असलेला नाला फुटला असल्याने कत्तलखान्याजवळच सांडपाणी जमा होते. त्यातच अनेकदा जनावरांची हाडे, मांस टाकले जाते. त्यामुळे बारासिंगल परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. शिवाय कुत्रे हे मांस बाहेर काढतात. त्यामुळे अनेकदा कुजलेले मांस असलेली हाडे घरापर्यंतही येत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी नमूद केले.

अस्वच्छतेमुळे बळावले आजार

कत्तलखान्यामुळे नेहमीच विविध आजार होत असून, नागरिकांचा जीव धोक्यात आहे. त्यातच कत्तलखान्याविरुद्ध कुणाजवळ शब्दही काढला तर जीवाला धोका असल्याचे एका तरुणाने सांगितले. शहरात अवैध अतिक्रमणावर कारवाई सुरू आहे. परंतु या अवैध कत्तलखान्याला महापालिकेकडूनच अभय असल्याचे येथे स्वच्छतेसाठी येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवरून दिसून येत आहे.

नगरसेवक हताश, नागरिक बेजार

मनपाच्या प्रलंबित निवडणुकांचा फटका सामान्यांना बसतो. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जाटतरोडी येथे राहणाऱ्या गेडाम बाई यांचे आहे. त्या मागील तीन महिन्यांपासून त्यांचे तुंबलेले गटार स्वच्छ करण्यासाठी नगरसेवकाकडे चकरा मारत आहेत.

मात्र, सध्या आम्ही नगरसेवक नसल्याने तुमचे प्रश्न मार्गी लावू शकत नाही, अशी खंत नगरसेवकांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे त्यांना आपले बाथरूम बंद ठेवून पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ आली आहे.

‘आम्ही कुणाला सांगावे जशी वेळ आहे तसे आम्ही भागवून घेतो. पूर्वी माझे पतीची मला मदत असायची. आता एकटी असल्याने रोज गटराचे पाणी काढतच माझ्या दिवसाची सुरुवात होते. दूषित पाणी साफ करतच माझे उरलेले आयुष्य काढावे लागणार की काय? अशी चिंता गेडाम बाई यांनी बोलून दाखवली.

जुगार, दारूचे अवैध अड्डे

बारासिंगल या वस्तीत कत्तलखाना तर जाटतरोडी वस्तीत अनेक घरांत दारू, जुगाराचे अवैध अड्डे आहेत. जाटतरोडी ही फार जुनी वस्ती दाट वस्ती आहे. या वस्तीत लहान लहान गल्लीतून जावे लागते. त्यामुळे अनेकदा पोलिस जात नाही. परिणामी या भागात दारूचा महापूर वाहतो, असे येथील नागरिकांनी सांगितले. या दारूच्या अड्ड्यांमुळे लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचे येथील सोनू या तरुणाने सांगितले.

एकेकाळची ऐतिहासिक विहीर आज कचराघर!

जाटतरोडीला परिसराच्या सुरवातीस सार्वजनिक जुनी विहीर आहे. ही विहीर तिच्या गोड पाण्याने सर्वत्र प्रसिद्ध होती. जोटतरोडीवासीयांच्या पाण्याची तहान हीच विहीर भागवत आली आहे. मात्र, नळ आल्यापासून या विहिरीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

येथे आता लोक कचरा टाकतात, गणपती विसर्जनासाठी या विहिरीचा उपयोग लोकं करत आहेत. त्यामुळे ही विहीर डास व विषारी प्राण्याचे घर झालेली आहे. परिसरातील नागरिक विहीर बुजवायची म्हणून येथे कचरा टाकतात. कुणाला त्याबाबत हटकले तर ते अंगावर धावून येतात. प्रशासनाने तर संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे, असे कांता करमरकर यांनी आपले दुखडे मांडले.