Nagpur : महिलेची अश्‍लील चित्रफीत बनवून ब्लॅकमेलचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

obscene tape woman

Nagpur : महिलेची अश्‍लील चित्रफीत बनवून ब्लॅकमेलचा प्रयत्न

मौदा : नागपूर-भंडारा महामार्गावरील गुमथळाजवळ एका कंपनीतील हेल्पर महिलेची अश्‍लील चित्रफीत तयार करून ती समाज माध्यमावर व्हायरल करण्याची व पतीला जीवे मारण्याची एकाने धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला मौदा पोलिसांनी रात्री अटक केली. गुमथळा येथील कंपनीत पीडित महिला आणि तिचा पती एक वर्षांपासून हेल्पर म्हणून काम करीत आहेत.

महिलेची अश्‍लील चित्रफीत करून ब्लॅकमेलचा प्रयत्न

त्याच कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या रघुवेंद्र उपाध्याय याने पीडित महिलेला लग्न करण्याची गळ घातली. मात्र, तिने माझे लग्न झाले असून दोन मुले असल्याचे सांगून नकार दिला. काही दिवस हे प्रकरण बंद होते. मात्र, आरोपीने महिलेसोबत मोबाईलवर बोलणे सुरू केले. रघुवेंद्र तिला व्हिडिओ कॉल करून धमकी देत होता. व्हिडीओ कॉल केला नाही तर तुझ्या पतीला जीवे मारेन म्हणून धमकी देत होता.

त्यामुळे तिने घाबरून व्हिडीओ कॉल केला. हा प्रकार त्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. ही संधी साधून आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. हा प्रकार तिने पतीला सांगितला. मात्र, जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे दोघेही गप्प बसले. त्यानंतर आरोपीने ३० डिसेंबर २०२२ ला महिला कामावर असताना तिचा हात पकडून अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच ४ जानेवारीला सुद्धा तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. यामुळे त्रस्त झालेल्या पती-पत्नीने मौदा पोलिसात तक्रार नोंदविली. मौदा पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी रघुवेंद्र उपाध्याय याला अटक केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

अटकेसाठी ठिय्या

आरोपीला अटक करण्यात यावी, याकरिता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तक्रार न घेणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई व्‍हावी तसेच आरोपीला अटक होत नाही तोवर हलणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या नातेवाइकांनी घेतली. यामुळे तणावाचे वातावरण होते.