Nagpur : कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Carbon dioxide

Nagpur : कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले

कामठी : महानिर्मिती औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उपाययोजना तसेच हवा प्रदूषण नियंत्रणासाठी एफजीडी उभारणी (फ्लू गॅस डिसल्फरायझेशन) करण्याबाबत कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

कोराडी येथे ६६० मे.वॅट व खापरखेडा येथे ५०० मे.वॅट असे दोन्ही नवीन वीज प्रकल्प सुरू करण्यापूर्वी एफजीडी उभारणी करणे नियमानुसार आवश्यक होते. पण कुणीही गांभीर्याने घेत नाही. याबाबतीत राज्य सरकारने तात्काळ लक्षकेंद्रित करणे गरजेचे आहे.

या औष्णिक वीज केंद्रांमुळे हवेतील कार्बनडाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढलेले आहे. वनस्पती, प्राणी, मानव व सर्व सजीवांसाठी प्राणवायू (ऑक्सिजन) हा अत्यंत आवश्यक वायू आहे. या प्राणवायूचे प्रमाण कमी कमी होत आहे. प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या वनस्पतींचे प्रमाणही कमी आहे. त्यातून सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.

हवेच्या प्रदूषणामुळे सजिवसृष्टीचा नाश होत आहे. सर्वत्र निसर्गाचे मूळ सौंदर्य कमी होत असून आजूबाजूचा परिसर भकास, ओसाड बनत आहे. हरण, ससे, मुंगूस यांसारखे प्राणी व मोर, घार, कावळा, मैना, पोपट, कबुतर, चिमणी यांसारखे पक्षी दुर्मिळ झाले आहेत. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री नागपूरवासींचे लाडके असल्याने त्यांच्या कार्यकाळात महानिर्मितीमध्ये ऐतिहासिक ''एफजीडी'' उभारणी होईल, अशी आशा येथील सामान्य जनतेला आहे.

विद्युत निर्मिती केंद्रावर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उपाययोजना, हवा प्रदूषण नियंत्रणासाठी एफजीडी उभारणीसह केल्या जाईल, असे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी १४ फेब्रुवारीच्या भेटीत नमूद केले होते. त्याची सुरुवात कोराडी आणि खापरखेडा येथून होईल, असेही ठाकरे यांनी सांगितले होते. सरकार बदलल्याने सध्या तरी काहीही हालचाली नसल्याची माहिती आहे. कोराडी ६६० मे.वॅट व खापरखेडा ५०० मे.वॅट येथील नवीन वीज केंद्रांचा लोकार्पण सोहळा संपन्न होऊन वर्षे लोटली, पण एफजीडींच्या निविदा प्रक्रिया पूर्णत्वास जात नाही. ही आश्चर्यकारक बाब आहे. राज्य सरकारने तात्काळ युध्दास्तरावर मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.

हे आहेत धोके-

हवेच्या प्रदूषणामुळे खोकला, फुप्फुसाचे रोग, मानसिक विकार होतात.

रक्तातील हिमोग्लोबीनमध्ये कार्बन मोनाक्साइड वायू संयोग पावतो, परिणामी रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतो.

डोकेदुखी, बुद्धी भ्रष्ट होणे, चक्कर येणे आदींचे प्रमाण वाढते व शेवटी मृत्यू होतो.

हृदयविकार, विषबाधा, कर्करोग, हाडांचे आजार बळावतात.

नाक, घसा, श्वासनलिकांचे आजार वाढतात.

डोळे लाल होतात. डोळ्यांची आग होते.

हवेच्या प्रदूषणामुळे गर्भपात होतात व मानवी गर्भात जन्मतः विकृती निर्माण होऊन ते बाळ मंदबुद्धी, लुळे, दुबळे, विकृत असे जन्माला येते.

त्यामुळे वाढतात खोकला, सर्दीचे आजार

कारखान्यातील उष्णताग्राहक प्रदूषणांमुळे रक्ताभिसरणात बिघाड निर्माण होतो. हाडांचे आजार होतात. कोराडी व खापरखेडा येथील आजूबाजूच्या परिसरात हवा व पाण्याच्या प्रदूषणाने डोळे, नाक, कान, घसा, फुप्फुस व श्वसनाचे आजार वाढत आहेत. सल्फर डाय ऑक्साइडची हवेतील पातळी वाढली तर खोकला व सर्दीचे आजार वाढतात.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानिर्मिती कोराडी, खापरखेडा वीज निर्मिती केंद्राकडून प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना आखतात, किती निधी खर्च करण्यात येतो, यावर जनजागृती होणे गरजेचे आहे.

-भूषण चंद्रशेखर, जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर (ग्रा.), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

औष्णिक वीज केंद्रांनी पर्यावरण हिताची उत्पादनेच खरेदी करावी. वायू प्रदूषण कायद्यांना पाठिंबा द्या व त्यांचे पालन करावे. आजूबाजूचे वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यामध्ये लोकसहभागातून एकमेकास मदत करावी.

-उषा रघुनाथ शाहू, तालुकाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, कामठी