नागपूर : मध्यवर्ती कारागृहात कैद्याचे मोठ्या प्रमाणात गांजा आणि मोबाईलचे नेटवर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur jail

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात कैद्याचे मोठ्या प्रमाणात गांजा आणि मोबाईलचे नेटवर्क

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात कैद्याचे मोठ्या प्रमाणात गांजा आणि मोबाईलचे नेटवर्क असल्याचा संशयावरून शहर पोलिसांनी तब्बल चार तास कारागृहात सर्च केला. यावेळी ५ ग्रॅम गांजा एका कैद्याकडून जप्त करण्यात आला. त्यामुळे कारागृहात गांजा आणि मोबाईलचे मोठे रॅकेट असल्याचा खुलासा आता होताना दिसून येतो आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.

सोमवारी कारागृहात फाईल्सच्या माध्यमातून बॅटरी आणि गांजा नेण्याच्या प्रयत्न करणाऱ्या सूरज कन्हैयालाल कावळे याला पोलिसांनी अटक केली. यावेळी मध्यवर्ती कारागृहात गांजा व मोबाइलच्या बॅटऱ्या पोहोचविणाऱ्या टोळीचा सूत्रधार पोलिस उपनिरीक्षक असल्याची खळबळजनक माहिती तपासादरम्यान समोर आली. याप्रकरणात कालपर्यंत मोक्काप्रकरणातील आरोपी सूरज कन्हैय्यालाल कावळे (वय २२ रा.खापरखेडा) याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात कारागृहातील बंदिवान पोलिस उपनिरीक्षक शुभम कावळे याचाही समावेश असल्याचे दिसून आले

दरम्यान कालचे अटकसत्र सुरू केल्यावर पोलिसांना कारागृहातून एका फोनच्या माध्यमातून विविध कैदी आपले नेटवर्क ऑपरेट करीत असल्याची कुणकूण लागताच अतिरिक्त पोलिस महानिरीक्षकांच्या (कारागृह) परवानगीने आज सकाळी ६ वाजता दोन पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वात ३५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्च ऑपरेशन राबविले. यावेळी बॉम्ब शोध व नाशक पथक, अंमली पदार्थविरोधी पथक आणि इतर पथकांचाही समावेश होता. तपासणीमध्ये कळमन्यातील खुनाच्या आरोपात असलेल्या फैजान याच्याकडे ५ ग्रॅम गांजा आढळून आला.

याशिवाय पोलिसांनी बॅटरीच्या माध्यमातून नेटवर्क ऑपेरट करणाऱ्या मोबाईलचाही शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. दरम्यान तपासामध्ये कारागृहातील बऱ्याच कैद्यांमार्फत मोबाईलचा सर्रासपणे वापर होत असून गांजाचाही मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे आढळून आले आहे.

सध्या पोलिसांना अटक केलेल्यामध्ये शुभम कावळे, सूरज कावळे, सूरज वाघमारे, अमली पदार्थ तस्कर मोरेश्वर सोनवणे, मुकेश बाबू पंजाबराव नायडू, भागीरथ थारदयाल, कुख्यात शेखू टोळीचा सदस्य अर्थव खटाखटी, फैजान आणि प्रदिप नितवणे याचा भाऊ सचिन नितवने एकाचा यांचा समावेश आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिस व अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे.

न्यायालयात येणारे सगळेच रडारवर?

सूरजला न्यायालयात अमली पदार्थ व मोबाइलच्या बॅटऱ्या देण्यात आल्या. याप्रकरणात निष्काळजीपणा केल्याचे समोर आल्याने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी तडकाफडकी आरोपी सेलच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यात हेडकॉन्स्टेबल प्रकाश मुसळे व शिपाई हेमराज राऊत यांचा समावेश होता. मात्र, हे सर्व प्रकार न्यायालय परिसरातून होत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून या परिसरात येणारे वकील, गुंडाचे नातेवाईक आणि कारागृहातून येणारे पोलिसही शहर पोलिसांच्या रडारवर असल्याचे संकेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.

आरोपींविरूध्द मोक्काची तयारी

पोलिसांनी कारागृहात गांजा आणि मोबाईल बॅटरी नेण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या ९ जणांवरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी काही जणांची अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींच्या संख्येत वाढ होणार आहे. सध्या आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

Web Title: Nagpur Central Jail Quantity Ganja Mobile Network

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..