Nagpur : नागपूर आता उंच इमारतींचे शहर!

गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी; फ्लॅट्‍सच्या किंमती ६० लाखांपासून चार कोटींपर्यंत
 buildings
buildingssakal

नागपूर : समोर अंगण आणि टुमदार घर, एक-दोन मजली बंगल्यापासून सुरू झालेला नागपूरचा प्रवास टोलेजंग इमारतींपर्यंत पोहोचला. शहरात गगनचुंबी इमारती वाढत आहेत. सध्या ४० हून अधिक १० ते १५ मजली इमारतींचे बांधकाम सुरू आहे. ५०० पेक्षा अधिक गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, त्याचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे आगामी काळात नागपूरला इमारतींचे शहर अशी नवी ओळख मिळाल्यास वावगे ठरणार नाही.

उपराजधानीत उंच इमारतींची संख्या वाढत असताना लक्ष्मीपुत्रांची बंगल्याची इच्छा कमी होत आहे. जमिनीच्या तुटवड्यामुळे आणि वैयक्तिक घरापेक्षा सुरक्षा आणि सुविधांमुळे बहुमजली इमारतींकडे अनेक जण आकर्षित होत आहेत. मुलांसाठी खेळाचे मैदान, जिम, पार्टीसाठी सुविधा, सुरक्षा आणि सीसीटीव्हीसह इतर पायाभूत सुविधांमुळे फ्लॅट्सच्या किमती वाढल्या आहेत. शहरातील पहिली सहा मजली इमारत मेयो रुग्णालयासमोर असून, त्याचे बांधकाम १९७५ च्या दरम्यान झाले.

शहर आणि लगतच्या परिसरात १२ ते २० मजली इमारतींमध्ये ‘टू आणि थ्री बीएचके’ घ्यायचे झाल्यास किमान ६० लाखांपासून दोन कोटींपर्यंत रक्कम गरजेची आहे. रामदासपेठ, बहिरामजी टाऊन, धरमपेठ, धंतोली, रविनगर, कडबी चौक, लक्ष्मीनगर, सिव्हिल लाइन्स, फ्रेन्ड्स कॉलनी, खामला, शिवाजीनगर या भागात फ्लॅटच्या आकारानुसार किमती आकारल्या जातात. याशिवाय ‘थ्री’ बीएचके आणि ‘फोर’ बीएचके फ्लॅट चार कोटींपर्यंत आहेत. त्याचा आकार चार ते पाच हजार चौरस फुटांपर्यंत आहे.

शहरं त्या देशातील प्रगतीची निदर्शक असतात. पायाभूत सोयी-सुविधा, शिक्षणाच्या सोयी, रोजगाराच्या संधी, आरोग्यव्यवस्था आणि इतर अनेक बाबतीत शहरं तुलनेने ग्रामीण भागांच्या पुढे असतात. शहरातील वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरांमध्ये इमारतींची उंची वाढत जाते आणि म्हणूनच सध्या अस्तित्वात असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, अपार्टमेंट्स आणि बहुउद्देशीय कॉम्प्लेक्स याच मूलभूत गरजेतून निर्माण झाले आहेत.

इमारतींचा प्रवास

१९२० ते १९७० मध्ये टुमदार बंगले

१९७१ ते १९८० क्रॉंक्रीटच्या दोन ते चार मजली इमारती

१९८० शहरातील पहिली अकरा मजली बिल्डिंग

१९८० ते २०२० पर्यंत ः तीन ते दहा मजली ‘ओनरशिप फ्लॅट’ संस्कृती

२०२० ते २०२३ पर्यंत ः बहुमजली इमारतीच्या संस्कृतीला सुरुवात

शहरात मोठ्या बिल्डिंग बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्राहकांचा कलही सुरक्षा आणि उत्तम प्रकारच्या सुविधा या प्रकल्पामध्ये देण्याचा बांधकाम व्यावसायिकांचा प्रयत्न आहे. या सुविधांमुळेच हायराईज बिल्डिंगची संस्कृती शहरात वाढत आहे.

-ऋषी सतपाल कपूर, चेअरमन, विदर्भ रिअलेटर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com