नागपूर : काँग्रेस आक्रमक, रेल्वे रोखली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Congress agitation against central government Agneepath scheme

नागपूर : काँग्रेस आक्रमक, रेल्वे रोखली

नागपूर : अग्निपथ योजना मागे घेण्याच्या मागणीसाठी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत अजनी येथे रुळावर झोपून रेल्वे अडवली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्र एक्स्‍प्रेस गोंदियाकडे पुढे निघाली. रेल्वे रुळावर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धा तास आंदोलन केले. याप्रकरणी आरपीएफने आंदोलकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेस राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांच्या नेतृत्वाखाली आज अजनी रेल्वे स्टेशनवर जोरदार आंदोलन केले. त्यांनी गोंदियाकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस अडवली. मागण्या पूर्ण होईस्तोवर हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रेल्वे प्रशासनातही धडकी भरली. जवळपास अर्धा तास ही रेल्वे अडवून ठेवण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहता पोलिसांनी बळाचा वापर करत या कार्यकर्त्यांना रुळावरून हटविले व रेल्वेचा मार्ग सुरळीत करून दिला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निपथ योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

विविध भागातही आंदोलने

युवक कॉंग्रेसने अजनी येथे आंदोलन केले तर शहर कॉंग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागात स्थानिक कॉंग्रेस नेते, कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले. काटोल रोड सिग्नल चौकात सकाळी आमदार विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता ऑरेंज सिटी चौकात, वर्धमाननगर, सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. आंबेडकर चौक येथे आमदार विकास ठाकरेंसह आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्‍वात आंदोलन करण्यात आले. दक्षिण नागपुरात गिरीश पांडव यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या.

१० आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

रेल्वे गाडी क्रमांक ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस रोखणाऱ्या १० आंदोलनकर्त्यांवर आरपीएफने प्रवाशांच्या सुरक्षेला धोका, रेल्वे रोखणे आदी गुन्हे दाखल करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये बंटी शेळके यांच्यासह विशाल राजेश वाघमारे, स्वप्नील सुभाष ढोके, विजय गोपाल मिश्रा, अतुल मनोहर नागपुरे, मोहित खान, राज सुरेश संतापे, आकाश दुर्गाप्रसाद गुर्जर, नयन लालजी तरडकर, इरफान काजी बुराद्दीन या दहा जणांचा समावेश आहे.

Web Title: Nagpur Congress Agitation Against Central Government Agneepath Scheme Blocking Railway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..