
Nagpur Convention : हिवाळी अधिवेशन दोन की तीन आठवड्यांचे?
नागपूर : दोन वर्षांनंतर राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात नागपुरात होणार आहे. अधिवेशनाचे कामकाज दोन आठवड्यांचे निश्चित करण्यात आले असले तरी ते तीन आठवडे चालविण्याचा मानस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. तर दुसरीकडे गुजरात निवडणुकीमुळे अधिवेशन एक आठवडा आधीपासून सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ५ डिसेंबरला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक असून, यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
करारानुसार विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपूरला होणे बंधनकारक आहे. परंतु, कोरोनामुळे सलग दोन वर्षे अधिवेशन झाले नाही. राज्याच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच वेळ असेल की, सलग दोन वर्षे अधिवेशन झाले नाही. यंदाचे अधिवेशन १९ डिसेंबरपासून घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांच्या राहण्याची योग्य व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच विधान भवनाची रंगरंगोटी, इतर देखभाल दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. ९५ कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला असून, ६० ते ७० कोटींमध्ये सर्व कामे करण्यात येतील. अधिवेशन विदर्भाच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातीलच आहेत. विदर्भ विकासाच्या मुद्यावर ते आग्रही राहिले असून, वेगळ्या विदर्भाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे अधिवेशन किमान तीन आठवडे चालविण्याचा त्यांचा मानस आहे. एका बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांसमक्ष ही भावना व्यक्त केली. त्यामुळे अधिवेशन तीन आठवड्यांचे असेल, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
नेते, मंत्री प्रचारात!
दुसरीकडे गुजरात निवडणूक सुरू असून प्रचारासाठी अनेक मंत्री, नेते तेथे हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी एक आठवडा आधी करण्याचीही चर्चा आहे. विधिमंडळातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५ डिसेंबरला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे. अधिवेशन केव्हापासून व किती आठवड्यांचे घ्यायचे, या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.