
नागपूर : कोरोनानंतर घर खरेदीचा पॅटर्न बदलला
नागपूर : कोरोना काळात मोठ्या शहरांमध्ये घर खरेदीचे पॅटर्न आता बदलले आहे. आता लोक गर्दीच्या ठिकाणी घरे घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे डेव्हलपर्सनीदेखील शहराबाहेर घरे बनविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता अनेकजण बाहेर सुरक्षिततेसाठी घरे घेण्याचा विचार करत आहेत, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष राजेंद्र आठवले यांनी सांगितले.
कोरोना महामारीची पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यात घरे खरेदीची पद्धत बदलत आहे. कारण सध्या लोक आरोग्य सुरक्षेला पसंती देत आहेत. त्यामुळे या वर्षात जास्तीत जास्त घरांची खरेदी शहरापेक्षा ग्रामीण भागात केली जात आहे. तसेच आता ग्राहक ई-स्कूलिंग, घरातून काम
आणि सुरक्षेच्या दृष्टीने घर विकत घेत आहेत.
अशा परिस्थितीत विकासक घर खरेदीदारांची मागणी लक्षात घेऊन ग्रामीण भागात घरांची उभारणी करत आहेत. बांधकाम क्षेत्राला सध्या बरे दिवस आलेले आहे. मात्र, वाढलेल्या दरवाढीचा फटका बसू लागला आहे. शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पाच हजारपेक्षा अधिक फ्लॅट विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर वर्धा रोड, दाभा, बेसा, घोगली, नरसाळा, पारडी, लाव्हा, जयताळा आदी आउटस्कर्ट मधील भागांत घरांची विक्री वाढत असते. या सर्व भानगडीत सामान्य ग्राहकाला स्वहक्काचे स्वस्त दरात चांगल्या दर्जाचे घर हवे असते. त्या स्वप्न्नासाठी आयुष्यभर व्यक्ती खस्ता खात असतो. कोरोनाच्या काळात बांधकाम क्षेत्राला स्टॅम्प ड्युटी कमी केल्याचा फायदा झाला. दरम्यान, लोकांची मानसिकता लक्षात घेत घरांची निर्मिती झाली.
फ्लॅटला खरेदीदारच नाहीत
कोरोनानंतर कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने बांधकाम खर्चात वाढ झालेली आहे. त्यामुळे ''बहुतांश फ्लॅट स्कीम रिकाम्या पडून आहेत. बांधकाम खर्च चाळीस टक्क्यांनी वाढला आहे. घर तयार आहे पण वाढलेल्या किमतीमुळे कुणी ते घ्यायला तयार नाही. यासाठी सरकार कारणीभूत आहे. जीएसटी, कच्च्या मालाच्या मनमर्जी वाढणाऱ्या किमतीवर नियंत्रण नसणे यामुळे दर वाढले आहेत. महागडी घरे घेण्याची लोकांची क्रयशक्ती नसल्याने घरे रिकामी आहेत, असेही ते म्हणाले.
Web Title: Nagpur Corona Pandemic Builders Association Of India Home Buying
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..