Nagpur : मेडिकलच्या सामान्य कचऱ्यात कोरोना ‘वेस्ट’

तीन दिवसांत दुसऱ्यांदा जैविक कचरा ः धंतोली झोनकडूनही नोटीस
medical waste
medical wastesakal media

नागपूर : मेडिकल प्रशासनाकडून सामान्य कचऱ्यात जैविक कचऱ्याचा समावेश केला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. महापालिकेच्या घनकचरा विभागाने नोटीसही बजावली. परंतु मेडिकल प्रशासन सुधारण्याच्या स्थितीत नसल्याचे आज पुन्हा अधोरेखित झाले. शुक्रवारी मेडिकलच्या सामान्य कचऱ्याच कोरोना चाचणीसह ऑपरेशन साहित्य, सलाईन ट्युब आदी आढळून आले. त्यामुळे धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाने नोटीस बजावली.

सामान्य कचऱ्यात मेडिकलचा कोरोना कचरा

बुधवारी मेडिकल प्रशासनाकडून सामान्य कचऱ्यात जैविक कचरा टाकण्यात येत असल्याची बाब पुढे आली होती. महापालिकेने नोटीस बजावल्यानंतरही मेडिकल प्रशासनाकडून सामान्य कचऱ्यात जैविक कचरा टाकणे सुरूच असल्याचे दिसून आले. मेडिकल प्रशासनातील सामान्य कचरा गोळा करण्यासाठी एजी एन्व्हायरो कंपनीची गाडी दररोज येते. सर्वसाधारणपणे सामान्य कचरा काळ्या रंगाच्या, जैविक कचरा लाल रंगाच्या तर सॅनिटरी कचरा पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये जमा केला जातो.

परंतु मेडिकल प्रशासनाने काळ्या रंगाच्याच बॅगमध्ये सामान्य कचऱ्यासोबत जैविक कचराही टाकल्याचे एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ कंपनीचे प्रोजेक्ट हेड डॉ. समीर टोणपे यांच्याशी संपर्क साधला. डॉ. टोणपे तत्काळ मेडिकल परिसरात पोहोचले. त्यांनी काळ्या रंगाच्या सर्व बॅग उघडल्या.

यात त्यांना इंजेक्शन, सलाईन बॉटल, कोरोना चाचणीचे साहित्य, पीपीई किट, हॅंड ग्लोव्हज, मास्क व ऑपरेशननंतर फेकण्यात येणारे साहित्य आढळून आले. महापालिकेच्या घनकचरा विभागने नोटीस बजावल्यानंतर मेडिकल प्रशानाकडून दखल घेतली नसल्याने सारेच आश्चर्यचकित झाले. टोणपे यांनी धंतोली झोनच्या उपद्रव पथकातील जवानांनाही बोलावून घेतले. त्यांनी या कचऱ्याचे फोटो आदी काढून लगेच मेडिकल प्रशासनाला नोटीस बजावली.

मेडिकल वैद्यकीय अधीक्षकांना नोटीस

सामान्य कचऱ्यात जैविक कचरा आढळून आल्याने धंतोली झोनमधील उपद्रव शोध पथकाने मेडिकल प्रशासनाच्या वैद्यकीय अधीक्षकांना नोटीस बजावली. याशिवाय धंतोलीच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली. याप्रकरणात धंतोली झोनमध्ये तत्काळ उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे नमुद करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वीच मेडिकल प्रशासनाला सामान्य कचऱ्यात जैविक कचरा आढळल्याप्रकरणी नोटीस बजावली. आज पुन्हा मेडिकल परिसरातच सामान्य कचऱ्याच्या काळ्या बॅगची तपासणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात घातक जैविक कचरा आढळून आला. ही बाब गंभीर असून उपद्रव शोध पथकाने नोटीस बजावली आहे.

- डॉ. गजेंद्र महल्ले, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

मेडिकल प्रशासनाने लाल, पिवळ्या व काळ्या रंगाच्या बॅगमध्ये कचरा विलगीकरण करून देणे अपेक्षित आहे. लाल रंगाच्या बॅगमध्ये जैविक कचरा, पिवळ्या रंगाच्या बॅगमध्ये सॅनिटरी कचरा व काळ्या रंगाच्या बॅगमध्ये सामान्य कचरा देणे आवश्यक आहे. परंतु आज काळ्या रंगाच्या बॅगमध्ये जैविक कचराही आढळून आला.

- डॉ. समीर टोणपे, प्रोजेक्ट हेड, एजी एन्व्हायरो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com