Nagpur : दहनघाटांवर अशिक्षित कर्मचारी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur crematorium

Nagpur : दहनघाटांवर अशिक्षित कर्मचारी?

नागपूर : शहरातील काही दहनघाटांची दुर्दशा झाली आहे. त्यातच आता दहनघाटांवरील कर्मचारी मृतकांच्या नावांची नोंद करता स्पेलिंगमध्ये चूक करीत असल्याने मृत्यू प्रमाणपत्रात चुकीच्या नावाची नोंद होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या नावात दुरुस्तीसाठी कुटुंबीयांना जन्म-मृत्यू विभागात फेऱ्या माराव्या लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दहनघाटांवर अशिक्षित कर्मचारी तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली असून त्यांच्यामुळे शेकडो मृत्यू प्रमाणपत्रात चुकीच्या स्पेलिंगमुळे नावातच बदल झाल्याने नागरिकांना दुरुस्तीसाठी पुन्हा अर्ज करावा लागत आहे.

महापालिकेतील भोंगळ कारभार सध्या चर्चेचा विषय आहे. यात मृत्यू प्रमाणपत्रासाठी अतिशय संवेदनशील असलेल्या दहनघाटावरील कर्मचारीही अपवाद नसल्याचे नरेंद्रनगर येथील रहिवासी राजेश पौनीकर यांच्या वडिलांच्या नावाचे मृत्यूपत्रातून अधोरेखित झाले. राजेश पौनिकर यांना मुलीच्या महाविद्यालयीन कामकाजासाठी वडिलांच्या मृत्यू प्रमाणपत्राची गरज पडली असता त्यांनी महापालिका गाठली.

दहनघाटांवर अशिक्षित कर्मचारी?

मृत्यू प्रमाणपत्र मिळाले पण वडिलांच्या नावाच्या स्पेलिंगमध्येच चूक असल्याची बाब पुढे आली. पौनिकर यांच्या वडिलांचे नाव श्यामजी असून प्रमाणपत्रावर SHYMJI अशी स्पेलिंग लिहिण्यात आली. यातील A गायब असल्याचे प्रमाणपत्रावरून दिसून आले. त्यामुळे पौनिकर यांनी येथील एका महिला कर्मचाऱ्याकडे विचारणा केली. या महिला कर्मचाऱ्याने संगणक विभागातही पाहणी केली. संगणकात नोंद असलेल्या नावातूनही A गायब असल्याचे दिसून आले. या महिलेने राजेश पौनिकर यांना महापालिकेच्याच दुसऱ्या इमारतीत असलेल्या जन्म-मृत्यू विभागातून दुरुस्ती करून आणण्यास सांगितले. पौनिकर याच विभागातील दिनेश निर्मले या कर्मचाऱ्याला भेटले. त्याने मृत्यू नोंदणी रजिस्टर तपासले असता त्यातही श्यामजीच्या स्पेलिंगमधून A गायब असल्याचे दिसून आले.

या घटनेने दहनघाटांवरून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावात घोळ केला जात असल्याची बाब पुढे आले. या घोळामुळे पौनिकर यांनाच नव्हे तर अशी अनेकांना दुरुस्तीसाठी पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे आता पौनिकर यांना नावात दुरुस्तीसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतरच नावात दुरुस्ती केली जाणार असून तोपर्यंत त्यांची कामे रखडणार आहेत. महापालिकेच्या फेऱ्या माराव्या लागणार त्या वेगळ्याच!

मूळ प्रमाणपत्रातून A कुणी गायब केला?

पौनिकर यांची वडील श्यामजी यांचे ४ नोव्हेंबर २००४ रोजी निधन झाले. २५ नोव्हेंबर २००४ रोजी राजेश पौनिकर यांना वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळाले. त्यात स्पेलिंग योग्य होती. अशा स्थितीत मूळ नावाच्या स्पेलिंगमधील A कुणी गायब केला, असा प्रश्न पौनिकर यांनी उपस्थित केला.

मुलीच्या शिक्षणात अडथळा

पौनिकर यांनी मुलीच्या शैक्षणिक कामासाठी जात प्रमाणपत्राची गरज पडली. जात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्यांना मृत्यू प्रमाणपत्राची गरज भासल्याने ते महापालिकेत गेले अन् नवीन घोळ पुढे आला. त्यामुळे मुलीचे जात प्रमाणपत्र तयार करण्याची प्रक्रिया रखडली असून शिक्षण घेण्यात अडथळा निर्माण झाला

महापालिकेने मृत्यू प्रकरणात नावाची नोंदणी करण्यासाठी दहनघाटांवर योग्य व शिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. कर्मचाऱ्याने स्पेलिंगमध्ये एक चूक केल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना दुरुस्तीसाठी नाहक कोर्ट, महापालिका कार्यालये फिरावे लागते. यात सामान्य नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होतो

- राजेश पौनिकर, नरेंद्रनगर.

Web Title: Nagpur Crematorium Uneducated Workers Name Spelling Mistakes Birth Death Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..