Nagpur Crime News : चेनस्नॅचिंग करणारी ‘गुलाबी गॅंग’च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nagpur Crime News : चेनस्नॅचिंग करणारी ‘गुलाबी गॅंग’च

नागपूर ; धंतोली परिसरात महिलेचे मंगळसूत्र हिसकाविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणींना शुक्रवारी (ता.२४)सायंकाळी अटक करण्यात आली. यातील दोन तरुणींपैकी एक अल्पवयीन असून त्या दोघेही शहरात लुटपाट करणाऱ्या ‘गुलाबी गॅंग’च्या सदस्या असल्याची माहिती समोर आली आहे.

त्रिशा मोहम्मद खान (वय २० रा. पडोळे हॉस्पिटलजवळ प्रतापनगर) असे युवतीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अरुंधती देवेंद्र तगनपल्लीवार (वय ५३ रा. विवेकानंदनगर, धंतोली) या धंतोली परिसरातील रामकृष्ण पार्क समोरुन फिरत होत्या. त्यांना मागून दुचाकीवरून येणाऱ्या २० ते २२ वयोगटातील दोन तरुणींनी आवाज दिला. त्यामुळे त्यांनी मागे वळून बघताच, त्यांच्या गळ्यातीळ सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अरुंधती यांनी समयसुचकता दाखवित, मागे बसलेल्या तरुणीचा हात पकडला आणि ओढले. त्यामुळे ती दुचाकीवरून पडली. अरुंधती यांनी आरडाओरड केल्याने पळून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणींना नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले.

चेनस्नॅचिंग करणाऱ्या ‘गुलाबी गॅंग’च्या सदस्या

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभा एकुर्ले यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले. त्यामध्ये एक १७ वर्षीय युवतीचाही समावेश होता. तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक खुलासे झाले. केवळ दोन युवती या प्रकारामध्ये नसून त्यांची पाच चे सहा युवतींची ‘गुलाबी गॅंग’ शहरात लुटमार माहिती समोर आली. याशिवाय त्यांनी यापूर्वी शहरातील काही ठाण्याच्या हद्दीत चार गुन्ह्यात सोन्याचे दागिनेही लुटल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात अजूनही नवे खुलासे होणार आहे.

त्रिशाचा पहिलाच गुन्हा

चेनस्नॅचिंगच्या घटनेत धंतोली पोलिसांच्या हाती लागलेली त्रिशा खान ही पहिल्यांदाच या गॅंगमध्ये सामील झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यातून कुख्यात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत तिने चेनस्नॅचिंगचा प्रयत्न केला. मात्र, तो फसल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्यावर इतर कुठलाही गुन्हा नसून अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वीच एका वृद्धेला गंडविल्याची माहिती समोर आली आहे.