नागपूर : महिला न्यायाधीशांसह आयटी प्रोफेशनलची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur cyber crime Fraud of IT professionals including women judges Online trading

नागपूर : महिला न्यायाधीशांसह आयटी प्रोफेशनलची फसवणूक

नागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये सायबर चोरट्यांचा हैदोस वाढला असून एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात महिला न्यायाधीश आणि पुण्यातील आयटी प्रोफेशनल दाम्पत्यांना सायबर चोरट्यांनी लाखांनी गंडा घातल्याची तक्रार दोन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गुगलवरून ॲप डाऊनलोड करीत त्यातून ‘फास्ट टॅग’ रिचार्ज करणाऱ्या महिला न्यायाधीशाला सायबर चोरट्यांनी २ लाख ७५ हजाराने गंडविल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना १४ ते १५ मे दरम्यान घडली.

सोनाली मुकुंद कनकदंडे ( वय ४२ रा. सिव्हिल लाईन) यांना वाहनाचे ‘फास्ट टॅग रिचार्ज’ करायचे होते. त्यासाठी त्यांनी गुगलवरून फास्ट टॅग रिचार्ज ॲप डाऊनलोड केले. दरम्यान त्यामध्ये बॅकेचा डेबिटकार्ड नंबर टाकला. त्यातून फास्ट टॅग रिचार्ज केले. यानंतर त्यांनी मोबाईलवर नेटबॅकिंग उघडले असता पासवर्ड व युजर आयडी ‘इन हॅन्डलिंग’ दाखवितअसल्याचे आढळून आला. त्यामुळे त्यांनी बॅकेच्या कस्टमर केअरला विचारणा केली.

त्यावेळी त्यांच्या वेगवगळया खात्यातून २ लाख ७५ हजार ३९९ रुपये आरोपीने इतर खात्यात वळते केल्या समोर आले. याबाबत मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुण्यात आयटी कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या दाम्पत्याला फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये अधिकचा लाभाचे आमिष दाखवित सात लाखाने सायबर चोरट्याने गंडविले. याबाबत सासरे रमेश कुंभारे (वय ६१, रा. लहरीकृपा हाउसिंग सोसायटी खामला) यांनी प्रतापनगर येथे गुन्हा नोंदविला.

रमेश कुंभारे यांचे जावई पुण्यात आयटी कंपनीत काम करतात. त्यांना ५ जुलै २०२० साली बिहार येथील पाटणातून अवनीश पाराशर (रा. आशियाना दिघा रोड, राजीव नगर, पाटना) येथून फेसबुकच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रेडिंग करण्यासाठी सांगण्यात आले. या बदल्यात त्यांना अधिकचा नफा मिळेल असेही सांगण्यात आले. त्यामुळे सुरवातीला आठ दिवसात त्यांनी गुंतविलेल्या पैशावर दीड लाख आणि १ लाख असा नफा दिला.त्यातून त्यांनी १२ नोव्हेंबर २०२० पर्यंत पाच लाख, दीड लाख आणि ५० हजार रक्कम टप्प्याटप्प्याने गुंतविली. मात्र, त्याचा परतावा मिळत नसल्याने त्यांनी अवनीश यांचेशी संपर्क केला. मात्र, त्याचा प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी दोन वर्षानंतर सासऱ्यांमार्फत तक्रार दाखल केली.