
जास्त काळ अंगठा चोखणे धोक्याचे!
नागपूर : तान्ह्या बाळाला अंगठा चोखण्याची एक जन्मजात ऊर्मी असते. पुढे हीच सवय बनते. बऱ्याचदा लहान मुलांना शांत करण्यासाठी तोंडात निप्पल किंवा चोखणी देण्याची सवय लावली जाते. मात्र, काही काळानंतर हीच सवय पालकांसाठी डोकेदुखी ठरते. कारण पाच वर्षांपेक्षा जास्त काळ अंगठा चोखण्याची सवय कायम राहिल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
जास्त काळ अंगठा चोखण्याच्या सवयीमुळे बाळाचे दात पुढे येण्याची भीती असते. दुधाचे दात पडल्यावर पक्के दात येताना या सवयीमुळे दाताचे, हनुवटीचे आकार बिघडण्याची शक्यता असते. एवढेच नव्हे तर १५ ते १८ महिन्यानंतरही आईचे दूध पाजल्याने दातांना कीड लागण्याची भीती असते, असे निरीक्षण दंत चिकित्सकांनी नोंदविले आहे. सुक्ष्म जिवाणूंमुळे दातांना कीड लागते. चॉकलेट, वेफर्स, बिस्कीट हे खाद्यपदार्थ पालकच देतात, यामुळे लहान मुलांच्या दातांना कीड लागण्याचे प्रमाण वाढले. हे प्रमाण ७० टक्के आहे. तोंडात सूक्ष्मजिवाणू चॉकलेटसारख्या अन्नाच्या संपर्कात येतात. दातांमध्ये असेटिक ॲसिड तयार होते.ॲसिडमुळे दात गळायला लागतात.
दातांना कीड का लागते?
बाळाला रात्री झोपेत दूध पाजणे
दात व हिरड्या साफ न करणे
साखरयुक्त चिकट पदार्थांचे वारंवार सेवन
जेवल्यानंतर चुळ न भरणे
जीवनसत्त्वे व फ्लुराईडचे प्रमाण कमी असणे
१५ ते १८ महिन्यानंतरही आईचे दूध पाजणे
कीड लागल्यानंतर काय होते?
दातांमध्ये खड्डा तयार होतो
खड्ड्यात अन्न अडकल्यानंतर दुखणे सुरू होते
तोंडाची दुर्गंधी येणे
संसर्ग झाला तर हाडांमध्ये पू तयार होतो.
हिरड्यांना सूज येते.
हिरड्या गळण्याची भीती
-जबड्याच्या हाडांमध्ये पोकळी होते.
हे आहेत उपचार
दाताच्या रंगाचे जी.आय.सी. किंवा
कंपोझिट सिमेंट भरणे
स्टेनलेस स्टील वा झिरकोनिया
क्राऊन,कॅप लावणे
कीड जर मुळांपर्यंत गेली असल्यास
रूट कॅनॉल करून घेणे
प्रतिबंधात्मक उपचार
बाळ जन्माला येताच बालदंतरोग
तज्ज्ञाकडून तपासणी करून घ्यावे
बाळाला रात्री बॉटलने दूध पाजू नये
आईने वापरलेल्या चमच्याने बाळाला
खाऊ घालू नये
बाळाचा मुका घेणे टाळावे
१५ ते १८ महिन्यांनी आईचे दूध बंद करून
सकस आहार सुरु करावा.
पालकांनी मुलांचे दात दिवसातून दोन वेळा
मऊ ब्रशने स्वच्छ करावेत
चिकट, गोड पदार्थाचे सेवन केल्यानंतर
पाण्याने चुळ भरावी.
सहा वर्षे वयावरील मुलांसाठी फ्लुराईड टूथ
पेस्ट व माउथवाशचा वापर करावा
मुलाच्या दातांमध्ये खड्डा दिसला, दातांचा रंग बदलला की, कीड लागली असे समजावे. सुरवातीला दातामध्ये खडूच्या रंगाप्रमाणे पांढरा भाग दिसतो. जेवतांना व पाणी पिताना दात दुखतो, ही लक्षणेआढळून आल्यास त्वरित बालदंतरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. उपचार करण्याची पाळी येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत. त्यामुळे मुलांना गोड पदार्थ जास्त प्रमाणात देणे टाळावे.
-डॉ. रितेश कळसकर, विभागप्रमुख, बाल दंतरोग विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
Web Title: Nagpur Dangerous To Suck Thumb Expert Doctor Advice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..