Nagpur News: नागपूरचा पारा पाच अंशांनी घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur News

Nagpur News: नागपूरचा पारा पाच अंशांनी घसरला

नागपूर : उत्तर भारताकडून येत असलेल्या गारठायुक्त कोरड्या वाऱ्यांमुळे विदर्भात पुन्हा थंडीची लाट परतली आहे. लाटेमुळे नागपूरच्या तापमानात जवळपास पाच अंशांची घसरण होऊन पारा १३.८ अंशांवर आला. तर गोंदिया येथे राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. सध्या कडाक्याच्या थंडीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे या आठवड्यात शितलहर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.(Nagpur News)

विदर्भात कालपर्यंत ढगाळ वातावरण राहिल्याने पारा १७ अंशांच्या वर गेले होते. मात्र आकाश निरभ्र होताच थंडीचा कडाका वाढला. गेल्या चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात ४.९ अंशांची घट होऊन पारा १८.७ वरून १३.८ अंशांवर आला. तर विदर्भासह राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे १०.४ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. यवतमाळ व वाशीमचा अपवाद वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांच्या किमान तापमानात लक्षणीय घसरण झाली. कमाल तापमानही एक ते दोन अंशांनी खाली आले. गारठा व बोचऱ्या वाऱ्यांमुळे सध्या लहान-मोठ्यांसह सर्वच जण त्रस्त आहेत.

प्रादेशिक हवामान विभागाने या आठवड्यात पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविल्याने हुडहुडी वाढणार आहे. हवामान विभागानुसार, सद्यस्थितीत जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील पहाडी भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्याचवेळी राजस्थानकडूनही थंडगार वारे मध्य भारताच्या दिशेने वाहात आहेत. या दुहेरी प्रभावामुळेच विदर्भात थंडीची लाट पसरली आहे.