भूकंप झाला? कधी? आम्ही नाही ‘पाहिला’!

नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पाच महिन्यात १० वेळा भूकंपाची नोंद झाली. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देत केलेला ग्राऊंड रिपोर्ट.
nagpur earthquake ground report details 4 consecutive disaster management
nagpur earthquake ground report details 4 consecutive disaster managementSakal

- पराग मगर

शनिवारी ४ मे सलग दुसऱ्याही दिवशी जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने केली. यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू होते कुही शहराचा परिसर आणि लागूनच असलेले माळणी गाव. कुही हे तालुक्याचे ठिकाण, पण आपल्या परिसरात भूकंप झाल्याची कुठली बातमीही येथील नागरिकांनाच काय संबंधित शासकीय यंत्रणेलाही ठाऊक नव्हती हे विशेष.

नागपूर शहरापासून ३८ ते ४० किती अंतरावर असलेले कुही हे तालुक्याचे गाव. राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी वरून रामटेककडे जाताना एक रस्ता कुही कडे जातो. या मार्गावरील सुरगाव, डोंगरगाव परिसरातील काळ्या दगडांच्या खोल खोल खाणींनी( गिट्टी खदान) हा परिसर व्यापला आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसीलमध्ये कामासाठी विविध गावांतून आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी असते.

अधिकारी येतील आणि आपले काम होईल या आशेवर तहसीलच्या आवारात लोक बसलेले असतात. सोबतीला चहा बरा म्हणून टपरीवर गर्दी जास्त. टपरी चालकाचा अनेकांशी परिचय, त्यामुळे त्यालाच विचारलं की कुही परिसरात भूकंपाचे धक्के बसले त्याबाबत काही कल्पना आहे का तर तो थेट म्हणतो नाही.

मी इथेच तर आहे, मला तर काहीच नाही जाणवलं. एवढ्यावरच न थांबता तो बाजूच्या टपरी चालकालाही विचारतो, तोही नकारार्थी मान हलवतो. पाऊस आणि वाराधून खूप आल्याचे ते सांगतात, पण भूकंपाची लोकांना कल्पनाच नाही.

गावाहून आलेल्या नागरिकांना तर भूकंपाविषयी माहिती असल्याची शक्यता कमीच आणि अनेकांना विचारले असता अपेक्षेप्रमाणे ‘नाही’ उत्तरापेक्षा लोकांचे चेहरेच प्रश्नार्थक झाले आणि चेहऱ्यावर प्रश्न होता... भूकंप झाला? कधी? आम्ही नाही पहिला!

आपत्ती व्यवस्थापनच अनभिज्ञ

शासनदारबारी नोंद भूकंपाची नोंद झाल्याने आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात काही सूचना आल्या आहेत का, याबाबत माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालय गाठले असता संबंधितांचे उत्तर ऐकूनच ‘भूकंपा’चा धक्का बसला.

नैसर्गिक आपत्तीचा टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला कुहीला झालेल्या भूकंपाविषयी काही माहिती व सूचना आल्या आहेत का असे विचारले असता पुन्हा तोच प्रश्न अंगावर आला, भूकंप? कधी? आणि याही पुढे जाऊन ‘मला इथे दोनच महीने झाले’, असे सांगून त्या कर्मचारी मोकळ्या झाल्या.

पण भूकंप होऊन चारच दिवस झाले हे सांगताच लगेच व्हॉट्स अप वर काही सूचना येऊन गेल्या का? आपण काही मिस केलय का या विचाराचा हलकासा ‘भूकंप’ त्याच्या मनात जाणवला.’ सारवासारव करीत चहाची विचारणाही झाली. पावसाच्या, विजेच्या सर्व सूचना येतात आम्हाला.

आम्ही वर रोज रिपोर्ट पाठवतो असेही त्या सांगत सुटल्या. पण भूकंपाची सूचना ‘वरून’ तुम्हाला आली असेल ना, असे वितारताच पुन्हा एकदा मोबाइल तपासण्यात त्या गुंतल्या... त्यामुळे एकूण तालुक्यात भूकंप झालाच नाही, असं आपण म्हणू शकतो...

‘खोलवर’ विकासाचा भूकंप?

कुही परिसरात दगडांच्या खाणी आहेत. यातील अनेक खाणीं दगड संपून आता त्या रिकाम्या झाल्या आहेत. काहींमध्ये पाणीसाचून आहेत. ‘विकासा’साठी गिट्टी पुरविताना हा परिसर अतोनात खोदून आता तो केवळ खोल खड्डेमय झाला आहे. या खदानींमुळेही हा परिसर भूकंपाचे केंद्र असल्याचे पर्यावरण तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे विकास ‘खोलवर’ जात असून भूकंपाला कारण ठरतोय का? असा प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे. (उद्याच्‍या अंकात - मु.पो. कापसी खुर्द)

माळणीची मुले म्हणाली भूकंप आला...भूकंप आला

माळणी गाव भूकंपाच्या २.४ रिश्टर स्केल धक्क्याने भारतीय पटलावर पोहोचले. येथील ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्या सांगतात, प्रशासकीय स्तरावर आम्हाला याबाबत कुठल्याही सूचना आलेल्या नाही. हा धक्का खूपच सौम्य होता. त्यातच याच दिवशी गावात खूप वादळी वारा आणि पाऊस झाला.

पण नुकसान असे काहीच झालेले नाही. त्यांची भेट घेत बाहेर पडल्यावर आसपास खेळत असलेली काही मुले मात्र भूकंप आला...भूकंप आला... अशी ओरडताना दिसली. त्यांना याबाबत विचारले असता त्यातला एक मुलगा म्हणाला काल मी मोबाइलवर पाहिलं. खूप पाऊसही झाला. एकंदरीत त्या मुलाने भूकंपाच्या धक्क्याची बातमी आणि झालेला पाऊस एकत्र केला होता. पण त्याला याबाबत माहिती होते हेही नसे थोडे थोडके.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com