Nagpur : ‘EMI’च्‍या विळख्यात तरुणाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

EMI

Nagpur : ‘EMI’च्‍या विळख्यात तरुणाई

नागपूर : वाढत्या महागाईमुळे उत्पादनापेक्षा खर्च वाढत असताना बॅंकांच्या व्याज दरातही वाढ झाली आहे. चंगळवाद आणि भौतिक सुख-सुविधांची वाढती महत्वाकांक्षा तरुणाईला कर्जाच्‍या दरीत ढकलत आहे. २३ ते ४० वर्षे वयोगटातील सुमारे तीस टक्‍के नोकरदार, व्‍यावसायिक वर्गाचा उत्‍पन्नापेक्षा अधिक खर्च होऊ लागला आहे. त्यामुळे हा वर्ग ‘ईएमआय''च्या (मासिक हप्ता) विळख्यात सापडला आहे.

युवकांचा आता बचतीपेक्षा खर्चावर अधिक भर आहे. त्यामुळे ते बँकांच्‍या जोडीला एमबीएफसी (नॉन बँकिंग फायनान्‍शियल कंपनी), खासगी ॲप आदींच्‍या माध्यमातून कर्ज घेऊन आपल्या हौशी पुरवीत असतात. ई-कॉमर्सवरील वस्‍तू खरेदीसह खासगी आयुष्यात विविध वस्‍तूंच्‍या खरेदीसाठी ही कर्ज सुविधा उपलब्‍ध आहे. सुमारे तीस टक्‍के युवा वर्गावर कर्जाचे ओझे झाले आहे. दिवसागणिक हे प्रमाण सतत वाढत

‘ईएमआय’च्‍या विळख्यात तरुणाई

असल्‍याची माहिती पुढे आली आहे. गरजेनुसार वस्तू खरेदी करणे हे भारतीयांची पद्धत होती. आता सुलभतेने कर्ज मिळत असल्याने हव्या नसलेल्या वस्तूही खरेदी करण्यावर भर दिला जात आहे.

हे आहेत कर्जाचे प्रकार

गृहकर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, वैयक्‍तिक कर्ज हे कर्जाचे प्रचलित प्रकार आहेत. याशिवाय आधारकार्ड लोन, प्रॉपर्टी लोन, बिझनेस लोन, मार्कशीट लोन असे विविध प्रकारचे कर्ज उपलब्‍ध करून दिले जातात. याशिवाय ई-कॉमर्स साईट्‍सवर ‘पे-लेटर’ अर्थात आत्ता खरेदी करा व नंतर पैसे अदा करा असा पर्याय उपलब्‍ध करून दिला जातो. विविध प्रकारच्‍या वॉलेट्‌सकडून रक्‍कम अदा करण्यासाठी एक महिन्‍याच्‍या कालावधी देताना विविध बिले भरण्यासाठीची सुविधा उपलब्‍ध करून दिली जाते.

सीबिल होतो प्रभावित

क्रयशक्‍ती, क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतल्‍याने सुरवातीचा काही काळ हप्त्‍यासाठीच्‍या पैशांची व्‍यवस्‍था होऊन जाते. परंतु, काही महिन्‍यांनी हप्ते भरणे जड जात असल्‍याने, कर्जाची रक्‍कम थकते. याचा थेट परिणाम क्रेडिट स्‍कोअर अन्‌ सीबिल स्‍कोरवर होत आहे. त्यामुळे भविष्यात मोठे व आवश्‍यक कर्ज मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे हप्ते नियमितपणे भरणे अत्‍यंत आवश्‍यक आहे.

क्रेडिट कार्डांसाठी बँकांचा तगादा

कर्जाप्रमाणे बँकांकडून क्रेडिट कार्ड वितरणासाठी दिवसभर विविध कंपन्यांकडून फोन येतात. वार्षिक शुल्‍क शून्‍य असण्यासह अन्‍य विविध योजना उपलब्‍ध करून दिल्‍या जातात. सातत्याने कॉल येत असल्‍याने ग्राहकही ठराविक कालावधीनंतर कार्ड घेण्यासाठी प्रवृत्त होत असल्‍याची सध्याची स्‍थिती आहे.