
नागपूर : सोयी-सुविधा नसतानाही परीक्षा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा घेताना अनेक महाविद्यालयात गैरप्रकार सुरू असल्याची बाब समोर येत आहे. परीक्षेदरम्यान महाविद्यालयाची तपासणी केली असता तेथे कुठल्याही सोयी-सुविधा नसल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांना आढळून आले. विशेष म्हणजे हे महाविद्यालय एका एका दुसऱ्याच कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असल्याचे उघड झाले. त्यामुळे महाविद्यालयाचे केंद्र रद्द करीत, ते संताजी महाविद्यालयात हलविण्यात आले.
‘श्रीराधे महाविद्यालय’ असे सोयी-सुविधा नसलेल्या महाविद्यालयाचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाने त्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती सचिव राठोड यांनी दिली. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू असल्याने खुद्द परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे हे विविध केंद्रावर भेट देत आहेत. आज विद्यापीठाच्या सकाळी साडेनऊ वाजतापासून झुलॉजी, फिजिक्स आणि स्कील डेव्हलपमेंट या विषयाचे पेपर होते. त्यानुसार आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांनी खामला येथे असलेल्या श्री राधे महाविद्यालयाची पाहणी करण्याचे ठरविले.
मात्र, या परिसरात फिरताना, अर्धा तास हे महाविद्यालय नेमके कोठे आहे? हे त्यांना कळेना. दरम्यान महाविद्यालयाला संपर्क केल्यावर महाविद्यालय खामला येथील एका प्रतिष्ठीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात भाड्याच्या खोलीत असल्याची माहिती मिळाली. महाविद्यालयात गेल्यावर तिथे कुणीही नसल्याचे आढळून आले. तसेच नोटीस बोर्डवर आज परीक्षा असल्याची माहितीही नसल्याचे दिसून आले. अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर लिपिकही तिथे पोहचला. त्याने काही वेळातच पेपर सुरू करतो असे सांगितले. त्यातून काही वेळातच परीक्षा सुरू करण्यात आली. यावेळी परीक्षा संपताच परीक्षा व मूल्यमापन संचालकांनी पेपर सोबत घेत हे सेंटर रद्द केले. याशिवाय पुढील पेपर संताजी महाविद्यालयात घेण्यात येणार असल्याचे आदेश काढले. विशेष म्हणजे यापूर्वी त्याने पेपर घेतलेही नसल्याची माहिती समोर आली असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी सदर येथील अटलांटा महाविद्यालयात असाच प्रकार समोर आला होता. त्यातून परीक्षा विभागाने केंद्र रद्द केले होते. शहरात सोयीसुविधा नसलेली अशी बरीच महाविद्यालये आहेत. मात्र, त्यांच्याशी काही अधिकारी आर्थिक व्यवहार करीत धडाक्यात मान्यता व संलग्नीकरण देत असल्याची बाब यामुळे समोर आली आहे.
एलईसी समितीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
महाविद्यालयाला संलग्नीकरण देण्यासाठी विद्यापीठाद्वारे स्थानिक चौकशी समिती (एलईसी) तपासणीसाठी जात असते. ही समिती तेथील सोयी-सुविधेचा आढावा घेते. त्यानंतर हा अहवाल विद्यापीठाकडे जमा करण्यात येतो. या अहवालानंतर महाविद्यालयांना एक वा कायमस्वरुपी संलग्नीकरण देण्यात येते. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्यावर या महाविद्यालयाची तपासणी कोणत्या समितीने केली, त्याची तपासणी करीत, कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सचिव गिरीश राठोड म्हणतात, महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालकांनी खुद्द महाविद्यालयाची परिस्थिती पाहिली असता, केवळ दोन रुममध्ये महाविद्यालय सुरू असल्याचे दिसून आले. मात्र, याबाबत सचिव गिरीश राठोड यांनी महाविद्यालयात सर्वच सुविधा असून केवळ संस्थेला बदनाम करण्यासाठी असे बोलल्या जात असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयाला मान्यता असताना, त्यांच्या संकेतस्थळावर महाविद्यालयाला २००२ साली मान्यता मिळाल्याची माहिती देण्यात आली असून त्यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत सर्व मान्यताप्राप्त शिक्षक, अत्याधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि इतर सुविधा देण्यात आल्या असल्याचे नमूद केले आहे. यावेळी प्रत्यक्षात असे काहीच नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
Web Title: Nagpur Examination Without Facilities Education Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..