
Nagpur : नागपूरकरांनी अनुभवली थंड रात्र
नागपूर : ढगाळ वातावरण नाहीसे होताच विदर्भातील थंडीच्या लाटेने उग्ररूप धारण केले आहे. रविवारी किमान तापमानाने या वर्षातील ८.० अंशांचा नवा नीचांक नोंदवल्याने नागपूरकरांसाठी गुरुवारची रात्र यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंडगार होती. तर गोंदिया येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. शीतलहरीसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्याने थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली.
निष्काळजीपणा ठरू शकतो धोकादायक
नागपूर ः हिवाळा म्हणजे आनंद लुटण्याचा ऋतू. संक्रांतीच्या पर्वावर हिवाळ्याचा मनमुराद आनंद लुटताना आलेल्या शीतलहरीकडे दुर्लक्ष करू नका. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दिवसभर हिटर, ब्लेअर लावून खोलीत बसता येत नाही. कष्टकरी असो की, नोकरदार साऱ्यांना घराबाहेर जावे लागते. शीतलहरीकडे गांभीर्याने बघत आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. शीतलहरीबाबत निष्काळजीपणा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असा सूचक इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
ज्येष्ठांसह लहान मुलांना थंडीपासून संरक्षण देण्याची गरज आहे. तापमान १० अंश किंवा त्याहून कमी होते, तेव्हा या स्थितीला शीतलहर (थंडीची लाट) किंवा कोल्ड वेव्ह म्हणतात. थंड वाऱ्यांमुळे सर्दी, खोकल्यासोबतच डोकेदुखी, छातीत जडपणा आणि वेदना होतात. स्नायू दुखणे, श्वासोच्छवासाची समस्या, हातपाय सुन्न होत असल्याचे मेडिकलचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण शिंगाडे यांनी सांगितले.
बळावू शकतात आजार
त्वचारोग ः हिवाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या बळावतात. त्वचा कोरडी पडते, कधी लाल होते. खाज सुटते.
सांधेदुखी ः सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हिवाळा कठीण काळ असतो. यावेळी त्यांच्या सांध्यातील वेदना आणि सूज वाढते.
हृदयविकार ः हिवाळ्यात हृदय योग्यरीत्या रक्त पंप करू शकत नाही. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
दमा ः श्वसन नलिकेवर सूज येत असल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. खोकल्यामुळे छातीत कडकपणा येतो.
हे करा...
-शक्यतो कमीत कमी घरून बाहेर पडा
-बाहेर पडल्यास मास्क वापरा
-धूळ आणि धूर टाळा
-कोमट पाणी प्या
-मॉइश्चरायझर वापरा
-व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा
स्वतःला सक्रिय ठेवा, रक्तातील साखर आणि रक्तदाब सामान्य ठेवा. थंड वातावरणात नेहमी ताजे, गरम अन्न खावे. हृदय, दमा रुग्णांनी सतर्क राहावे. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्यांना कोरोना होऊन गेलेला असेल त्यांची फुप्फुसे काहीशी कमजोर असतात. यामुळे त्यांनी आरोग्याची खबरदारी घ्यावी.
-डॉ. प्रवीण शिंगाडे, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल, नागपूर