

Firefighters battle a blaze at a two-wheeler showroom in Deonagar, Nagpur, after a firecracker spark triggered the fire on Diwali night.
esakal
नागपूर, : दिवाळीच्या रात्री फटाक्याच्या ठिणगीमुळे देवनगरातील दुचाकीच्या शोरूमला भीषण आग लागली. यात २५ दुचाकीसह स्पेअर पार्ट्स, बॅटरी व अन्य साहित्य जळून सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवनगर परिसरातील सावरकर रोडवर घरमालक राजेंद्रकुमार आठवले यांच्या प्लॉट क्रमांक ए-१ येथे अतुल बापूराव झुलकंठीवार यांचे साई डायनामिक ऑटोव्हिल्स नावाने टीव्हीएस वाहनांचे शोरूम आहे. जी प्लस-२ स्वरूपाच्या इमारतीत हे शोरूम आहे. दिवाळीच्या दिवशी रात्री शोरूम बंद झाल्यानंतर परिसरात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. रात्री ९.३० च्या सुमारास एक फटाका शोरूममध्ये दुचाकी उभ्या असलेल्या ठिकाणी येऊन फुटला. त्यातून उडालेल्या ठिणगीने आग लागली. शोरूममध्ये इलेक्ट्रिक दुचाकी असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.