
Nagpur : विदेशी पाहुण्यांच्या आगमनाची उत्कंठा शिगेला
नागपूर : गेल्या महिनाभरापासून लगबग सुरू असलेल्या जी-२० आंतरराष्ट्रीय बैठकीची घटका जवळ येऊन ठेपली असून रविवारी सायंकाळी विदेशी पाहुण्यांचे शहरात आगमन होणार आहे. जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन, महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. औक्षण, हार घालून त्यांचे स्वागत होणार असून यावेळी ढोलताशांचा गजर आणि विद्यार्थी लोकनृत्य विशेष आकर्षण ठरणार आहे.
शहराला नववधुसारखे सजविण्यात आले असून उद्यापासून जी-२० साठी विदेशी पाहुण्यांचे आगमन होत आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता विदेशी पाहुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार आहेत.
त्यामुळे स्वागतासाठी विमानतळ परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करून ढोलताशे पथक सज्ज करण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी पाच मिनिटे लोकनृत्य सादर करणार आहेत. याशिवाय मराठमोळे फेटे बांधूनही त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
शनिवारी यासंदर्भात विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्ण बी., नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते. शनिवारी रंगीत तालीम घेण्यात आली.
सोमवारी उद्घाटन, मंगळवारी समारोप
२० मार्च रोजी दुपारी तीन वाजता हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये सामाजिक व अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
जगभरातील स्वयंसेवी संस्थांसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय यावर परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च रोजी परिषदेचा समारोप होणार आहे.