
Nagpur : ‘जी-२०’ बैठकीमुळे चौकांचे रुपडे पालटणार
नागपूर : ‘जी-२०’ आंतरराष्ट्रीय बैठकीचा मान नागपूरलाही मिळाला असून यानिमित्त शहराला नववधूसारखे सजविण्याची जबाबदारी महापालिकेवर देण्यात आली आहे. महापालिकेला ५१ कोटी रुपये मिळाले असून यामधून शहरातील चौकांच्या सौंदर्यीकरणावर भर देण्यात येत आहे. काही चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू झाले आहे.
जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था, सद्यःस्थिती, भविष्यातील नियोजन आदींवर चर्चा आणि धोरण ठरविण्यासाठी आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांची ‘जी-२०’ बैठक नागपुरात होणार आहे. या बैठकीत २० देशांतील दोनशेवर प्रतिनिधी सहभागी होणार आहे. त्यांच्या आगमनापूर्वी शहर स्वच्छ व सुंदर करण्याची कसरत सुरू असून महापालिकेला ५१ कोटी रुपये मिळाले आहेत.
शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, रस्त्यांची दुरुस्ती, उद्याने आणि रस्ता दुभाजकांचे सुशोभीकरण, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींची रंगरंगोटी, तुटलेल्या नाल्यांची दुरुस्ती, ड्रेनेज आदी कामांसाठी हा निधी वापरला जात आहे. या बैठकीत सहभागी होणारे विविध देशांचे प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळांची पाहणी करणार आहेत.
राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी गेल्या पंधरवड्यात बैठक घेऊन ‘जी-२०’साठी स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे
महापालिका सक्रिय झाली आहे. दीड वर्षापासून त्रासदायक ठरणारे खड्डे बुजविण्याची तयारी सुरू आहे. विकासकामांच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली असून नाली, गटर, चेंबरची दुरुस्ती करण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ
आतापर्यंत दुरवस्था झालेल्या उद्यानांचीही दशा पालटणार असून लँडस्केपिंग केले जाणार आहे. क्लॉक टॉवर दुरुस्ती करण्यात आली असून तेथे रंगबिरंगी फवारे करण्यात आले आहेत. येथून ते रहाटे कॉलनी या रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ तयार केली जात आहे. चौकाचौकात झेब्रा क्रॉसिंग, ट्रॅफिक सिग्नलचे मार्किंग, दुरुस्ती आणि रंगकामही करण्यात येणार आहे.