Nagpur शिकाऱ्यांना पकडणारी गीता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival

Nagpur : शिकाऱ्यांना पकडणारी गीता

नागपूर : स्त्रीच्या शक्तीची, कर्तृत्वाची, सामर्थ्याची तुलना, दुर्गेची शक्‍ती, सामर्थ्याशी केली जाते, असुरांशी दोन हात करुन दुर्गेने त्यांचा नाश करीत सज्जनांना दिलासा दिला. आपल्या आसपास अनेक महिला संघर्षाच्या वाटेवरून चालतात. अनुकूल परिस्थिती, कुटुंबीयांचा पाठिंबा, उच्च शिक्षणाच्या जोरावर विज्ञान, राजकारण, वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या महिलाही आहेत. अशाच एक सामाजिक वनीकरणातील विभागीय वनाधिकारी गीता सदाशिव नन्नावरे.

पहिलीच नियुक्ती वाघ आणि मानव संघर्ष अधिक असलेल्या ब्रम्हपुरी विभागात सहाय्यक वनसंरक्षक म्हणून झाली. तेव्हा त्या परिसरातील मानव- वन्यजीव संघर्ष कमी करणे मोठे आव्हान होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात, वनाधिकारी ते वनमजुरांसोबत पायपीट करून संपूर्ण जंगल समजून घेतले.

शिकाऱ्यांना पकडणारी गीता

लहानपणापासून जंगलांसोबत नाते असल्याने वन्यजीवांसोबत जगण्याची सवय असल्यांने भीती कधीच वाटली नाही. संघर्ष कमी करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेतल्याने गावकऱ्यांचे सहकार्य मिळविले. त्यामुळे वाघ अथवा इतर मासांहरी प्राणी दिसल्यास गावातील नागरिक संपर्क करीत. लगेत गावात सूचना दिल्या जात असल्याने तो संघर्ष कमी होण्यास मदत झाली.

नोव्हेंबर २०१६ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पात सहायक वनसंरक्षक-अवैद्य शिकार प्रतिबंधक या पदावर रुजू झाल्यात. तेव्हा तोतलाडोह जलाशयात अवैध मासेमारी जोमाने सुरु होती. त्यावर निर्बंध लावण्याचे प्रयत्न सुरू होते. २०१७ मध्ये वाघ शिकारीच्या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी आली. आमच्या चमूने १७ आरोपींना अटक केली व तीन वेगवेगळ्या वाघांच्या शिकार प्रकरणाचा छडा लावला. तसेच तोतलाडोह तलावातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी पोलिस व महसूल विभागाशी संपर्क साधून एकत्रितपणे अभियान राबविले. २०१८ मध्ये विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण या पदावर पदोन्नती झाली. राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून वने, वन्यजीव तसेच पर्यावरण विषयक जनजागृती करीत आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारून निसर्गाचा विनाश रोखण्यासाठी विद्यार्थी व नागरिक यांना प्रोत्साहित करणे. रोपवाटिकामध्ये दुर्मिळ प्रजातींची रोपे निर्मिती करून त्यांचे संवर्धनाचे काम नन्नावरे करीत आहेत.

असा घडला प्रवास

गीता यांचे बालपण गडचिरोली जिल्ह्यात गेले. त्यामुळे वन म्हणजेच आपले जीवन अशी धारणा होती. त्यामुळे पदवीचे शिक्षण घेतानाच प्रशासकीय सेवेत जाण्याचा निश्चय केला. २००७ मध्ये वनसेवेची राज्यसेवेच्या जागा निघाल्या. एमएससी किटकशास्त्राचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात वनसेवेत निवड झाली. २०११-१२ एक वर्ष डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण केले.