सरकार राशन देते...तेल, नमक, मिरची कहा से लाए? गोंड वस्तीच्या युवकांनी मांडली व्यथा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tufan Uike

दोनशे दहा घरे. घरे कसला, बांधलेल्या आड्यावर प्लास्टिक, फाटक्या कपड्यांनी पांघरूण घातलेल्या झोपड्या. उघड्यावरच बांधलेली आंगधुनी. वस्तीत शिरले की, किळस येते.

Nagpur News : सरकार राशन देते...तेल, नमक, मिरची कहा से लाए? गोंड वस्तीच्या युवकांनी मांडली व्यथा

नागपूर - कंट्रोलमधून राशन मिलता है साब...लेकीन...अनाज पकाने के लिये, तेल, नमक मिरची लगती है...कामधंदा नही, शायद गरीब का भगवान और रईस का भगवान दोनो अलगअलग है...गरीब का भगवान भी गरीब होता होगा...अमीर का भगवान भी अमीर होता होगा...इसलिये हम भी गरीब है. दो वक्त खाने को तरसते है. खाली पेट की भुखही हमारी धीरे धीरे जान लेती है...पेपरमे कुछ छपा तो हम आदिवासीयोकी छानबीन करणे के लिये सरकारी लोग आते...फोटो खिंचते चले जाते... लेकिन हमारे पापी पेट का सवाल खतम नही होता… ही कोण्या गावखेड्यातील माणसांच्या जगण्याची व्यथा नाही तर उपराजधानीतील सिद्धेश्वरनगरीतील गोंडवस्तीतील माणसांचे जगणे असेच आहे. त्यांनी आपल्या व्यथा सकाळ पेंडालमध्ये मांडून समस्या सोडविण्याची मागणी केली.

दोनशे दहा घरे. घरे कसला, बांधलेल्या आड्यावर प्लास्टिक, फाटक्या कपड्यांनी पांघरूण घातलेल्या झोपड्या. उघड्यावरच बांधलेली आंगधुनी. वस्तीत शिरले की, किळस येते. आपोआपच रुमाल काढण्यासाठी हात खिशात जातात. सारी उघडीनागडी काळपट पोरं सताड खेळताना दिसतात. त्यांच्या जगण्यातून नियतीने या गरिबांवर सूड उगवल्याचे दिसून येते. कुणाची झोळी ओसंडून वाहेपर्यंत भरलेली असते, तर या गोंड वस्तीतील प्रत्येकाची झोळी रीतीच आहे.

येथील प्रत्येक झोपडीतील कर्त्या पुरुषांचा चऱ्हाट अन हातात कुऱ्हाड घेऊन झाडे तोडण्याचा व्यवसाय होता. आता पोलिस पकडतात, जेलमध्ये रवानगी करतात. त्यामुळे हे झाडे तोडण्याचे काम सुटले. दोनशेवर कर्त्या पुरुषांच्या हातातील काम गेले आणि या वस्तीवर उपासमारीचे संकट घोंघावणे सुरू झाले. सरकारकडून मोफत रेशन मिळते. परंतु तेलमिठासाठी पैसे लागतात. यांचे खिसे रिकामे आहेत. गरिबी या माणसांच्या पाचवीला पुजली आहे. काही दिवसांपूर्वी रमेश प्रेमसिंग उईके मृत्यू पावला होता. त्यांच्या घरात धान्य होते, परंतु नुसते धान्य खाता येत नाही.जेवण पकविण्यासाठी तेल मीठ लागते. हळूहळू आमची भूकच आम्हाला आजारी बनवते, ही व्यथा तुफान उईके यांनी सकाळ पेंडालमध्ये व्यक्त केली.

आदिवासींना द्या घरकुलांचा लाभ

आम्ही गोंड वस्तीत ३० वर्षांपासून आहोत. ही जागा सरकारने द्यावी. या जागेचा सांभाळ केला, मात्र आता जमिनीचे भाव वाढले असतील, म्हणून येथून हटवण्यासाठी सारे कामाला लागले आहेत. आमच्या माणसांकडे आधार कार्ड आहे. या झोपड्यांच्या जागी आम्हाला आमच्या हक्काचे घरकुल बांधून द्यावे. आमच्यासाठी शबरी नावाची घरकुल योजना हाय म्हणतात..आम्हाला लाभच मिळत नाही, असे तुफान आपल्या भाषेत सांगत होते. ओल्या जमिनीवर अंथरूण घालून आम्ही राहतो, पण आमची कोणाला दया येत नाही, असेही तुफान उईके म्हणाला.

दोन वेळा अधिकारी आले

आदिवासी विकास विभागाच्या सामूहिक आणि वैयक्तिक योजना आहेत. ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, भूमिहीन अनुसूचित जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभीमान व सबलीकरण योजना, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, राजीव गांधी अपघात विमा योजना, अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी घरगुती गॅस संचाचा पुरवठा योजना आहेत. प्रशिक्षण योजनेत वाहन प्रशिक्षण, कंडक्टर प्रशिक्षण, सुरक्षागार्डचे प्रशिक्षण, प्लम्बरचे प्रशिक्षण, इलेक्ट्रॉनिक, जैविक तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आदी योजनांचा लाभ द्यावा.