Nagpur : ग्रामपंचायत निवडणुकीत तापले जातीय राजकारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat

Nagpur : ग्रामपंचायत निवडणुकीत तापले जातीय राजकारण

कोदामेंढी : एकमेकांवर चिखलफेक हे आजच्या घडीचे राजकारण झाले आहे. गटातटात जातीय समीकरण जुळवून उमेदवारांची जुळवाजुळव करणे सुरू आहे. तालुक्यात पंचवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका असून सर्वाधिक आरक्षण सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.

यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते जातीचा विचार करून त्याला तोड म्हणून त्याच जातीचा उमेदवार रणांगणात उतरवीत आहेत. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ या उक्तीनुसार डावपेच खेळणे सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायतराज निवडणुकीचे वारे थंडीच्या कडक्यात गरम वाहू लागले आहेत. चौकाचौकांत आणि गावकट्ट्यावर जिकडे तिकडे निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते बारीक नजर लावून आहेत.

आपल्या पक्षाच्या गटातील उमेदवार निवडून यावे याकरिता ताकद लावून आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी तालुक्यात चांगलीच छाप सोडली असल्याने त्यांनी केलेल्या विकासकामाचा बोलबाला आहे. काँग्रेसचे नेते सुरेश भोयर, तापेश्वर वैद्य यांची देखील ताकद पणाला लागली आहे. काँग्रेस गटातील रुसवे फुगवे आणि कार्यकर्त्यांची दुखावलेली मने यासाठी कोणती युक्ती वापरणार याकडे इतर पक्षाच्या नजरा लागून आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर आहेत. मात्र बऱ्याच गावात राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत फारशा चर्चा नाहीत. मनसे, आप, प्रहार संघटना आदी पक्षातील उमेदवारांचेदेखील नावे पुढे आलेले नाहीत.सरपंच पदाची लढत थेट जनतेतून असल्याने सरपंच पदाचा दावेदार कोण? ‘शेर से सव्वाशेर’ असा उमेदवार प्रत्येक राजकीय पक्षातून शोधला जात आहे.

असे आहे सरपंच पदाचे आरक्षण

चिचोली : सर्वसाधारण, नंदापुरी : सर्वसाधारण महिला, नेरला : सर्वसाधारण महिला, येसंबा : अनु. जमाती, निसतखेडा : सर्वसाधारण महिला, चाचेर : सर्वसाधारण महिला, राजोली : नामाप्र, नांदगाव : नामाप्र, खरडा : सर्वसाधारण महिला, अरोली : सर्वसाधारण महिला, खंडाळा : सर्वसाधारण, तारसा : सर्वसाधारण महिला, विरशी : सर्वसाधारण महिला, रेवराल : अनु. जाती (महिला), निमखेडा : सर्वसाधारण महिला, धनी : सर्वसाधारण, वाकेश्वर : सर्वसाधारण, धानोली : सर्वधारण, माथनी : सर्वधारण, कोदामेंढी : सर्वधारण, खात : नामाप्र (महिला), गोवरी : सर्वधारण, धानला : सर्वधारण महिला, महालगाव : सर्वधारण महिला, चिरव्हा : अनु. जाती