नागपूर : हनुमान चालिसावर एवढा राडा कशाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnvis

नागपूर : हनुमान चालिसावर एवढा राडा कशाला?

नागपूर : कुणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्यावर एवढा राडा कशाला? असा सवाल करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते व गृहविभागाने चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळल्याचा आरोप केला. सेनेच्या नेत्यांनी या प्रकरणातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न चालवला, पण ती मिळणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

नागपुरातून मुंबईला जाण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पत्रकारांसोबत बोलत होते. ते म्हणाले, कुणाच्याही घरावर आंदोलन करायला आमचा विरोध आहे. परंतु कुणी हनुमान चालिसा म्हणणार, म्हणून एवढी माणस गोळा करायची का? कुणी हल्ला करायला जाणार नव्हते, असे त्यांनी नमुद केले. खासदार नवनित राणा व त्यांचे पति आमदार रवि राणा यांना राष्ट्रीय नेता बनविण्याचा विडा शिवसेनेने उचलला की काय? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. राणा दाम्पत्य गेले असते, एखाद्या कोपऱ्यात हनुमान चालिसा पठन केला असता. त्याची कुणी दखलही घेतली नसती. परंतु शिवसेनेच्या नेत्यांना या प्रकरणातून सहानुभूती मिळेल असे वाटतं. पण सहानुभूती मिळणार नाही.

जे काही चाललंय, ते चुकीचे आहे, असे नमुद करीत त्यांनी सेनेला लक्ष्य केले. पोलिसांना हाताशी धरून सर्व प्रकार सुरू आहे. काल मोहित कंबोज यांच्यावरही पोलिस मदतीने हल्ला झाला. मोहित कंबोज यांच्याकडे तलवार आहे, बंदूक घेऊन होते, ॲसीड आहे असे म्हणणे हास्यास्पदच आहे. हल्ल्यानंतर त्यांच्यावर केसेस कशा टाकायच्या याची तयारी पोलिसांनी केली. पण सुदैवाने तिथे सीसीटीव्ही होते. सर्व सीसीटीव्ही कडे आमचे लक्ष आहे. आता पोलिस पुरावे बघून कारवाई करतात की दबावाला बळी पडतात ते बघू. पोलिसांच्या भरवशावर सत्तेचा माज आला आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

खासदार राऊत, वळसे पाटील यांच्यावर टिका

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असताना गृहमंत्रालयाचे बारा वाजले. यासाठी त्यांना कमीपणा वाटला पाहिजे. राष्ट्रवादीने गृहमंत्रालयाचे बारा वाजवले. आपलं अपयश झाकण्यासाठी ते भाजपच नाव घेतात, असेही फडणवीस म्हणाले. खासदार संजय राऊत यांना शिवसेनेत आणि बाहेर, कुठेही किंमत नाही. त्यांचे वक्तव्य शिवराळ असून घरी कुटुंबीय ऐकू शकत नाही. त्यांचे काहीही अस्तित्व नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

२० फूट गाडण्याची भाषा; पण सरकार गप्प

महाराष्ट्रात सद्यःस्थितीत जे काही चाललंय, ते बघून मन व्यतित झाले आहे. एक दाम्पत्य हनुमान चालिसा पठण करण्याची भाषा करते तर त्यांना दंडुकेशाहीने अटक केली जाते. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली जाते, पण त्याची साधी दखलंही घेतली जात नाही. सरकार सोयीस्करपणे गप्प का आहे, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.

Web Title: Nagpur Hanuman Chalisa Controversy Devendra Fadnavis

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top