नागपूर : वाळूची वाहतूक करणाऱ्यांकडून वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur hingana police sand transporter appointed special squad

नागपूर : वाळूची वाहतूक करणाऱ्यांकडून वसुली

हिंगणा : पोलिस ठाण्याच्या हद्दीत गिट्टी व वाळूविक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही कारणावरून पोलिस अडवितात. वसुली देणाऱ्या वाहनांना सोडले जाते. जे वाहनधारक वसुली देत नाही, त्यांची वाहने ठाण्यात जमा केली जातात. वसुलीसाठी एक विशेष पथक नेमण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे चित्र दिसून आहे.

हिंगणा पोलिस ठाण्यात नवीन ठाणेदार रुजू झाल्यापासून कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण पूर्णतः सुटले आहे. पोलिस ठाण्यातील तीन ते चार कर्मचारी स्वतःलाच ठाणेदार समजतात. कोणत्याही प्रकारची वसुली करण्याचे काम हे तीन कर्मचारी करीत असल्याचे सर्वसामान्यांमध्ये बोलले जात आहे. हे कर्मचारी कार्यालयात काम न करता केवळ वसुलीसाठी पोलिस ठाण्याचे चारचाकी वाहन घेऊन सतत अवैध व्यवसायिकांकडे फिरत असतात. मागील सहा महिन्यांपासून वाळू व गिट्टीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वसुली पथकाकडून लक्ष केले जात आहे.

दररोज शेकडो वाहने ठाण्याच्या परिसरात वाळू व गिट्टीची वाहतूक करतात. या वाहनावर या वसुली पथकाचे विशेष लक्ष असते. कोणत्याही कारणावरून ही वाहने रस्त्यावर अडवली जातात. त्यांच्याकडून वसुली केली जाते. वसुली देणाऱ्या वाहनांना सोडले जाते. मात्र नियमाप्रमाणे वाहतूक करीत असताना काही वाहनधारक पैसे देण्यास टाळाटाळ करतात. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून पोलिस ठाण्याच्या परिसरात वाहने जमा केली जातात. या प्रकारामुळे व्यावसायिक सुद्धा त्रस्त झाले आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या ठाण्यात कार्यरत आहेत. मात्र या विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. या शाखेतील एक कर्मचारी वसुलीच्या कामात व्यस्त असल्याचे बोलले जात आहे. ही सर्व वसुली ठाणेदाराच्या आदेशानुसार केली जात असल्याचे बोलले जात आहे. पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘चहापेक्षा केटली गरम’

हिंगणा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दुय्यम पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक हे अधिकारी कार्यरत आहेत. मात्र ठाणेदाराचे कर्मचाऱ्यावर नियंत्रण नाही. यामुळे काही कर्मचारी निर्ढावलेले आहेत. तीन कर्मचारी तर स्वतःलाच ठाणेदार समजतात. ठाण्यात व बाहेरील परिसरात वावर सुद्धा त्यांचा तशाच प्रकारचा आहे‌. हे कर्मचारी रात्री पोलिस ठाण्याचे वाहन घेऊन धाब्यासमोर उभे असतात, हा प्रकार सर्वसामान्य नागरिकांनी अनुभवला आहे. त्यामुळे चहापेक्षा केटली गरम हा प्रकार ठाण्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या गरम केटल्यांची चौकशी पोलीस आयुक्तांनी करणे अपेक्षित आहे.

Web Title: Nagpur Hingana Police Sand Transporter Appointed Special Squad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top