
नवजात बाळाची विक्री तीन वर्षांनी उघड!
नागपूर : पती आणि मुलगा दारूडा असल्याने म्हातारपणासाठी आधार म्हणून नवजात बाळाला तीन लाख रुपये देऊन विकत घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. हे प्रकरण २०१९ मधील असून महिलेच्या मोठ्या मुलानेच तक्रार दिल्याने तब्बल तीन वर्षांनंतर मानवी तस्करी विभागाने गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये तीन महिला आणि सलामुल्ला खान (वय ६२ रा. गिट्टीखदान) या एजंटचा समावेश आहे.
सलामूल्ला खानने तीन वर्षांपूर्वी ५५ वर्षीय महिलेला १० ते १२ दिवसांचे नवजात बाळ विकल्याची माहिती समोर आली. सुरेंद्रगड या परिसरात वास्तव्यास असलेल्या ५५ वर्षीय महिलेला बाळ हवे होते. शिक्षिका असलेल्या या महिलेने यासाठी त्यांनी अनेक डॉक्टरांकडे टेस्ट ट्युब बेबी (आयव्हीएफ) साठी प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी धंतोली येथील एका रुग्णालयात काम करणाऱ्या दोन परिचारिकांचा त्यांच्याशी संपर्क आला. त्यांनी बाळ मिळविण्यासाठी सल्लामुल्ला खान याच्याशी संपर्क करण्यास सांगितले.
सल्लामुल्ला खान याने तीन लाखांच्या बदल्यात नवजात बाळ देण्याचा सौदा केला. ठरल्याप्रमाणे सल्लामुल्ला खान हा झाशी राणी चौकात निलावार साडी सेंटरसमोर नवजात बाळाला घेऊन आला. तिथेच त्याने त्यांच्या हाती बाळ सोपविले आणि पैसे घेऊन निघून गेला. तीन वर्ष मुलाचे संगोपन केल्यानंतर त्यांच्यासमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.
दरम्यान ३१ मार्चला याबाबत मानवी तस्करी विभागाकडे याबाबत तक्रार आली. त्यातून या प्रकरणाच्या तपासास सुरुवात केली. त्यातून पोलिस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या पथकाने दोन परिचारिकांसह महिला आणि मुख्य सूत्रधार एजन्ट सल्लामुल्ला खान यांना अटक केली. सीताबर्डी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुरुवारी पथकाने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सादर करीत, त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे.
मुलानेच केली तक्रार
बाळ विक्रीच्या प्रकरणात खरेदी करणाऱ्या महिलेच्या मोठ्या मुलानेच तक्रार केल्याची बाब समोर आली आहे. संपत्तीमध्ये हा मुलगा वाटेकरी ठरणार असल्याचे बघून मुलाने ही तक्रार केल्याचे समजते. तक्रारीच्या आधारावर पोलिस पथकाने तपास केला. यावेळी बाळालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिस आणखी कुणी यात सक्रिय आहे काय? याचा शोध घेत आहेत.
मोठा मुलगा, पती व्यसनी
सुरेंद्रगड येथे राहणाऱ्या महिलेला दोन मुले होती. त्यापैकी लहान मुलाने गळफास घेत काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. मोठा मुलगा आणि पती या दोघांनाही दारुचे व्यसन होते. मोठा मुलगा संपत्तीसाठी तिचा छळ करीत होता. त्यामुळे ज्याच्या आशेवर जगता येईल, असा कुणी असावा, त्यासाठी त्यांनी बाळ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
Web Title: Nagpur Human Smuggling Newborn Baby Sale Revealed After Three Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..