अण्णा भाऊ साठेंची अवहेलना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anna Bhau Sathe
अण्णा भाऊ साठेंची अवहेलना

अण्णा भाऊ साठेंची अवहेलना

नागपूर : शोषित, दलित, पीडित वर्गाच्या वेदना शब्दबद्ध करीत शौर्याची दौलत देणारे लोकशाहीर(Lokshahir). पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती उपेक्षितांच्या तळहातावर तरली आहे, असे सांगणारे महाराष्ट्राचे प्रबोधनकार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांचे साहित्य जगप्रसिद्ध आहे. १३ लोकनाट्ये, १३ कथा, ६ नाटके, ३५ कादंबऱ्या, १५ पोवाडे, ७ चित्रपट कथांलेखनाचे धनी असलेल्या अण्णा भाऊंचे साहित्य १० भाषांमध्ये अनुवादित झाले. मात्र केंद्र शासनाने (Central government) अण्णा भाऊ प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित नसल्याचे कारण पुढे करीत प्रबोधनकाराच्या यादीत अण्णा भाऊंचे नाव महापुरुषांच्या यादीत सामील करण्याचे नाकारण्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

हेही वाचा: अकोला : मनपा क्षेत्रात ५०० फुटापर्यंत करमाफीचा ठराव घ्या!

भारत सरकारने सामाजिक न्याय विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तयार केले. या फाउंडेशनअंतर्गत देशभरातील महापुरुष, समाजसुधारक यांच्या विचारांचा प्रसार व प्रचाराचे काम होते. राष्ट्रीय तसेच राज्यातील समाजसुधारक, प्रबोधनकारांचा फाउंडेशनच्या यादीत समावेश आहे.

अण्णा भाऊ साठेंची अवहेलना

फाउंडेशनतर्फे अनुसूचित जातीसाठी कल्याणाच्या योजना राबवल्या जातात. तसेच समाजसुधारक, प्रबोधनकारांची जयंती साजरी करताना केंद्र शासनाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत केली जाते. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत रविदास, संत कबीर या महापुरुषांसोबतच राज्यपातळीवरील छत्तीसगढचे संत व सतनामी समाजाचे गुरू बाबा घासीदास, केरळचे पुलियार समाजाचे गुरू संत अय्यंकली, तमिळनाडूचे गुरू नंदनार, महाराष्ट्रातील संत चोखामेळा, संत नामदेव यांचा यादीत समावेश आहे. महाराष्ट्रातून प्रबोधनकार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा फाउंडेशनच्या यादीत समावेश करावा, या मागणीचा प्रस्ताव अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी ३१ जुलै २०११ केंद्र शासनाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या फाउंडेशनकडे सादर केला. यादीत लोकशाहिरांचे नाव सहभागी करून घ्यायचे की, नाही यासंदर्भात बैठक होणे अपेक्षित होते. मात्र बैठक न घेताच दिल्लीतील सामाजिक न्याय विभाग, फाउंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी प्रस्ताव नाकारला. नाकारताना पत्रातून ‘अण्णा भाऊ इज नॉट वेलनोन पर्सन’ असा उल्लेख केला. यामुळे समाजात असंतोष पसरला आहे.

हेही वाचा: नागपूर : ओमिक्रॉनसह कोरोनाचे संकट

"विविध राज्यातील संत, महापुरुषांची नावे यादीत सामील होत असल्यास महाराष्ट्राचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या यादीत सामील करावे. अण्णा भाऊंनी महाराष्ट्र जागविला. कामगार, कष्टकरी जागवला. एखाद्या अधिकाऱ्याने महापुरुषांबद्दल प्रतिष्ठित नसल्याचा उल्लेख करणे योग्य नव्हे. फाउंडेशनची बैठक घेऊन माहिती घेण्यात येईल. चौकशी करण्यात येईल."

-रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग, केंद्र सरकार

"लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगभरात प्रसिद्ध आहे. विविध भाषांमध्ये भाषांतरित झाले. साहित्यातून कष्टकरी माणूस अण्णा भाऊंनी उभा केला. एवढेच नव्हे तर स्वाभिमानाने जगण्याचे भान देणारे लोकशाहीर प्रबोधनकार म्हणून अण्णा भाऊ साठे यांचा समावेश फाउंडेशनच्या सूचीत केला नाही. उलट अवहेलना करणारे शब्द वापरले, त्या संचालकांवर कारवाई करावी."

-शिवा कांबळे, सदस्य, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, मुंबई

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurAnna Bhau Sathe
loading image
go to top