कारागृहात चोरट्यांचा हैदोस; कडक पहाऱ्यातही मंदिरात चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सातत्याने चर्चेत असलेल्या कारागृहात एकामागून एक घटना घडत असल्याचे चित्र असताना आता चक्क कडक पहाऱ्यात चोरट्याने परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

Nagpur Theft : कारागृहात चोरट्यांचा हैदोस; कडक पहाऱ्यातही मंदिरात चोरी

नागपूर - सातत्याने चर्चेत असलेल्या कारागृहात एकामागून एक घटना घडत असल्याचे चित्र असताना आता चक्क कडक पहाऱ्यात चोरट्याने परिसरात असलेल्या हनुमान मंदिरात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

कारागृह परिसरात शेतात हनुमान मंदिर आहे. शेतीला पाणी देण्यासाठी लोखंडी पाइपलाइन टाकण्यात आली आहे.

तसेच मंदिरात जाण्यासाठी मेट्रो रेल्वेने लोखंडी पूल बांधून दिला आहे. दोन दिवसांपूर्वी चोरटा तेथे आला. त्याने मंदिर व पुलाचे लोखंडी रॉड चोरी केले. कारागृह रक्षक मुरलीधर कामतवार (वय ५३ रा. कारागृह वसाहत) यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी धंतोली पोलिसांत तक्रार दिली. धंतोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्याचा शोध सुरू केला आहे. यापूर्वीही कारागृहात आरोपींकडे मोबाईल आणि बॅटरी नेताना काही सुरक्षारक्षक आढळले होते.

तसेच कारागृहातून आरोपींनी बऱ्याच वेळा कॉल केल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे आतापर्यंत ६ मोबाईल आमि १९ ते २० बॅटरी धंतोली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यातून एकदा पोलिस आयुक्तांनी कारागृह परिसरात शोध मोहीम राबविली होती. सातत्याने असे प्रकार घडत असताना प्रशासन जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. त्यामुळे सगळे काही प्रशासनाच्या मदतीने सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

कैद्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

कारागृहातून एकीकडे आरोपी मोबाईलद्वारे बाहेरील गुन्हेगारी विश्‍व हाताळत असताना, गेल्या काही महिन्यात येथील कैद्यांद्वारे आत्महत्येचाही प्रयत्न करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. याशिवाय एका कैद्याने सुरक्षारक्षकाला अधिकाऱ्यासमोरच मारल्याची घटनाही घडली आहे.

महिलांच्या बराकीत सीसीटीव्ही

कारागृहात गंभीर प्रकार घडत असताना पुरुष बराकीमध्ये सीसीटीव्हीची गरज आहे. मात्र, बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरा हे महिलांच्या बराकीत लावण्यात आल्याचे दिसून पडते. दुसरीकडे अशाच ठिकाणी कॅमरे आहेत, तिथून गुन्हेगारांवर लक्ष ठेवता येत नाही. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.