नागपूर : अपघातात पाय गमावूनही 'जिंकली' पदके

डोंगरगावच्या ज्योती गडेरियाची कमाल, भविष्यात एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार
ज्योती गडेरिया,पॅरा सायकलपटू
ज्योती गडेरिया,पॅरा सायकलपटूsakal

नागपूर : सहा वर्षांपूर्वी रस्ता अपघातात तिला एक पाय गमवावा लागला. मात्र ती हिंमत हारली नाही. खेळात करिअर करण्याच्या इराद्याने ती जिद्दीने मैदानात उतरली आणि अल्पावधीतच रोइंग आणि पॅरा सायकलिंग या दोन आशियाई स्पर्धांमध्ये देशाला पदके जिंकून विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. भविष्यात तिला जगातील सर्वात उंच माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करायचे आहे.

ही संघर्षपूर्ण पण तेवढीच प्रेरणादायी कहाणी आहे मोहाडी तालुक्यातील (जि. भंडारा) डोंगरगावची दिव्यांग खेळाडू ज्योती गडेरियाची. २४ वर्षीय ज्योतीला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. मात्र २०१६ मध्ये झालेल्या एका दुर्दैवी अपघाताने तिच्या स्वप्नांचा चुराडा केला. या अपघातात डावा पाय कापावा लागल्याने कधीकाळी धडधाकट असलेली ज्योती अपंग झाली. पण खेळाची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती.

पुण्यात जॉब करीत असताना ती सर्वप्रथम रोइंग (नौकानयन) शिकली. ऑलिंपिक दर्जाच्या या खेळात तिने २०१९ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई स्पर्धेतील सांघिक प्रकारात ब्रॉंझपदक जिंकले. मात्र या खेळासाठी अनुकूल वातावरण व सोयीसुविधा नसल्यामुळे तिने सायकलिंग करण्याचे ठरविले.

उल्लेखनीय म्हणजे, डोंगरगावच्या रस्त्यावर एका पायाने प्रॅक्टिस करत अष्टपैलू ज्योतीने याही खेळात आपली छाप सोडली. गेल्या महिन्यात ताजिकिस्थानमध्ये झालेल्या आशियाई रोड व पॅरा सायकलिंग स्पर्धेत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. येत्या जूनमध्ये होणाऱ्या आणखी एका आशियाई स्पर्धेची तयारी करीत असलेल्या ज्योतीने भविष्यात विश्व चॅम्पियनशिप व पॅरालिंपिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा बोलून दाखविली.

याशिवाय २०२५ पर्यंत माऊंट एव्हरेस्ट च्या शिखरावर चढण्याचेही तिचे स्वप्न आहे. ज्योतीचे वडील (राधेश्याम) यांचा गावात डेकोरेशनचा व्यवसाय असून, आई (उषा) गृहिणी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही दोघांनीही तिला खेळासाठी वेळोवेळी प्रोत्साहन दिले आहे. ज्योतीच्या कामगिरीचा कुटुंबीयांसह गावकऱ्यांनाही सार्थ अभिमान आहे.

आयुष्यात संकटे कितीही मोठे आली तरी कधीही हार मानायची नसते, हे मला खेळानेच शिकविले. अपघातात मी एक पाय गमावला; शरीराने अपंग झाले. मात्र मानसिकदृष्ट्या कणखर बनले. त्यामुळेच जे काम सामान्य करू शकत नाही, ते मी करून दाखविले. दिव्यांगांनाही माझा हाच सल्ला आहे.

-ज्योती गडेरिया,पॅरा सायकलपटू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com