
'सेंद्रिय शेती' ठरली वरदान
नागपूर : जमीन समतल केल्यानंतर योग्य नियोजन, सेंद्रिय खताचा वापर आणि पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन काटेकोरपणे केल्यामुळे तुरीचे उत्पादन प्रतिएकरी १० क्विंटल घेऊन विक्रम केला आहे. प्रयोगशील शेतकरी कृष्णा सांबारे यांनी शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील गोटाड पांजरी येथील सहा एकर शेतीत तूर लागवड करुन नवा आदर्श निर्माण केला आहे. स्टील ट्रेडिंगचा व्यवसाय असलेले सांबरे यांना शेती व बागकामची आवड होती. त्यामुळे ते विविध पिकांची लागवड करून परंपरागत शेतीच्या व्यतिरिक्त अनेक प्रयोग करीत होते. त्यात यशही मिळत होते. जमीन कसण्यात आनंद मिळू लागल्याने नवनवीन प्रयोग करण्याचा उत्साह वाढत होता.
काही शेतकरी बेडच्या दोन्ही बाजूच्या दांडातून पाणी सोडतात. पारंपारिक पद्धतीने संपूर्ण शेतात शेणखत घालतात. ते पावसाच्या पाण्याने अथवा दांडाच्या पाण्यामुळे वाहून जाते. एकीकडील पीक कुपोषणाने आणि दुसऱ्या बाजूचे पीक अति खाद्याने मरते. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी ‘व्ही‘ टाइप पद्धती शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी उत्तम असल्याचा दावाही त्यांनी केला. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अवकाळी आलेल्या पावसाने पिकांवर कीड आली. मात्र , सांबारे त्यांनी कोणतेही कीटकनाशक अथवा रासायनिक खतांचा वापर केला नाही. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवातून तयार केलेल्या सेंद्रिय खताचा वापर केला. पत्नी माया कृष्णा सांबारे यांचेही यात मोलाचे योगदान आहे.
सेंद्रिय खत कसे तयार करायचे
सेंद्रिय खत घरच्या घरी अतिशय सोप्या व आर्थिक दृष्ट्या स्वस्त पद्धतीने तयार करता येते. कीटकनाशकही तयार केले. त्यासाठी एका २०० लिटरच्या प्लास्टिकच्या पिंपामध्ये पाच लिटर दही, १९५ लिटर पाणी,एक पाव टाकाऊ ताब्यांची तार टाकावी. एक महिना त्याला बंद करुन ठेवल्यानंतर त्याचे विशिष्ट प्रकारचे संजीवन तयार झाले. ते पिकावर पडणाऱ्या किडीवर रामबाण उपाय आहे. १५ लिटर पाण्यात ५० मिली लिटर ते संजीवन टाकल्यानंतर त्याची फवारणी केली. त्यामुळे पिकांवरील कीड नाहिशी झाली.
अशी केली जमीन तयार
सहा एकर क्षेत्रात ‘व्ही‘ या पीक पद्धतीने लागवड करण्यापूर्वी जमीन समतल केली. नांगरून बेड तयार केले. त्यात व्ही आकाराचे खाचे तयार केलेत. त्यात कुजलेले शेणखत टाकले आणि सहा फूट बाय दोन फूट टोपण पद्धतीने वाणाची पेरणी केली.
Web Title: Nagpur Krishna Sambare Organic Farming 10 Quintal Production Per Acre
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..